छायाचित्रांमधून फुलली विद्यार्थ्यांची कल्पकता
विद्यानिकेतन शाळेत जागतिक छायाचित्र दिन उत्साहात साजरा

विद्यार्थ्यांच्या फोटोचे मान्यवरांनी केले कौतुक
धामणगाव रेल्वे/19 ऑगस्ट – धामणगाव एज्युकेशन सोसायटी संचालित विद्यानिकेतन सीबीएसई स्कूलमध्ये जागतिक छायाचित्र दिन मोठ्या थाटामाटात पार पडला. या निमित्ताने आयोजित विशेष कार्यशाळेत इयत्ता 6 वीच्या विद्यार्थ्यांनी मोबाईल आणि कॅमेर्याच्या साहाय्याने निसर्गातील विविध घटकांची सुंदर छायाचित्रे टिपून आपल्यातील कल्पकता सिद्ध केली. अभ्यासासोबतच विद्यार्थ्यांनी विविध कलांचा छंद जोपासावा, असे आवाहन शाळेचे संचालक राजेंद्र जोशी यांनी यावेळी केले.
धामणगाव रेल्वे येथील विद्यानिकेतन शाळेत विद्यार्थ्यांच्या निरीक्षणशक्तीला आणि सर्जनशीलतेला वाव देण्यासाठी या खास छायाचित्रण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात इयत्ता 6 वीच्या मुलांनी अतिशय आवडीने सहभाग घेतला. मोबाईल आणि कॅमेर्याचा वापर करून निसर्ग, परिसर आणि दैनंदिन जीवनातील वेगवेगळे सुंदर क्षण मुलांनी आपल्या कॅमेर्यात कैद केले. मुलांनी टिपलेल्या या सुंदर छायाचित्रांचे प्रदर्शनही शाळेत भरवण्यात आले होते.कार्यक्रमादरम्यान संचालक राजेंद्र जोशी यांनी विद्यार्थ्यांच्या फोटोचे मनापासून कौतुक केले. केवळ पुस्तकी अभ्यासात न अडकता संगीत, चित्रकला आणि छायाचित्रण यांसारख्या कला जोपासाव्यात, असे ते म्हणाले. या उपक्रमासाठी कलाशिक्षक अजिंक्य काडगळे, विज्ञान शिक्षक हर्षल नरोडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शिक्षकांच्या योग्य मार्गदर्शनामुळे मुलांनी एकापेक्षा एक सरस फोटो काढून सर्वांची मने जिंकली.
कलागुणांना वाव देणारा उपक्रम -छायाचित्रण ही केवळ फोटो काढण्याची पद्धत नसून त्यामागील सौंदर्य आणि भावना समजून घेण्याची कला आहे. तंत्रज्ञानाचा चांगला वापर करत मुलांमधील सुप्त गुण आणि सौंदर्यदृष्टी विकसित व्हावी, याच उद्देशाने शाळेत या कार्यशाळेचे आयोजन केले होते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला मोठे व्यासपीठ मिळाले असून परिसरातून या उपक्रमाचे मोठे कौतुक होत आहे.




