एमएसईबी उपकार्यकारी अभियंत्यास लाच घेताना अटक
सोलर मीटर रिलीज ऑर्डरसाठी लाचेची मागणी

धामणगाव रेल्वेत एसीबी पथकाची कारवाई
धामणगाव रेल्वे /19 ऑगस्ट – सोलर पॅनेलचे काम करणार्या एका चोवीस वर्षांच्या तरुणाकडून मीटर रिलीज ऑर्डर काढून देण्यासाठी एक हजार रुपयांची लाच उकळणार्या महावितरणच्या उपकार्यकारी अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज ऐन रंगेहाथ पकडले. राहुल निळकंठ उमरे वय 49 वर्षे, उपकार्यकारी अभियंता वर्ग दोन, म.रा.वि.वि. कार्यालय धामणगाव रेल्वे असे लाचखोर अधिकार्याचे नाव आहे. या कारवाईमुळे महावितरण वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
देवगाव येथील तक्रारदाराला एका ग्राहकाकडे सोलर पॅनेल बसवण्याचे कंत्राट मिळाले होते. सर्व ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण झाल्यावरही मीटरची रिलीज ऑर्डर अडकून पडली होती. ही ऑर्डर मिळवण्यासाठी तक्रारदार महावितरण कार्यालयात गेले असता, उपकार्यकारी अभियंता राहुल उमरे यांनी कामाच्या बदल्यात एक हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराची पैसे देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी थेट अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली.
पडताळणी दरम्यान राहुल उमरे यांनी लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर आज सापळा रचून तक्रारदाराकडून एक हजार रुपये स्वीकारताना उमरे यांना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी धामणगाव रेल्वे पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे. ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक बापू बांगर, उपअधीक्षक राजेश राठोड यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक योगीता ठाकरे, नीलीमा सातव, सुजाता बनसोड, सुधिर चर्ज न, प्रमोद रायपुरे, उपेंद्र थोरात, सचिन अठुर यांच्या पथकाने केली.




