महापालिकेची आज वादळी आमसभा; विविध प्रश्नांवर नगरसेवक होणार आक्रमक

करवाढीसह अनेक मुद्द्यांवरून जोरदार गदारोळ पाहायला मिळण्याची शक्यता

शहरवासीयांच्या प्रश्नांवर विरोधकांसह सत्ताधारीही प्रशासनाला घेरणार

अमरावती /19 ऑगस्ट – अमरावती महानगरपालिकेची बहुप्रतिक्षित आमसभा आज 20 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आली असून, या सभेत शहराशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्न आणि समस्यांवरून जोरदार रणकंदन माजण्याची चिन्हे आहेत. मालमत्ता करातील अभूतपूर्व वाढ, तीन वर्षांच्या थकबाकीची वसुली आणि शहरातील नागरी सुविधांचा बोजवारा यासारख्या गंभीर मुद्द्यांवर सर्वच पक्षांचे नगरसेवक अत्यंत आक्रमक भूमिका घेणार असल्याने आजच्या आमसभेत मोठा गदारोळ पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे.राज्य सरकारने मालमत्ता कराच्या नव्या दरांवरील स्थगिती उठवल्यामुळे अमरावतीकरांवर अचानक पडलेला आर्थिक भार हा आजच्या सभेतील मुख्य केंद्रबिंदू असणार आहे.
सन 2022 मधील फेरमूल्यांकनानुसार प्रति चौरस मीटर 210 रुपये या नव्या दराने कर आकारणी आणि मागील तीन वर्षांतील फरकाची रक्कम वसूल करण्याच्या प्रशासकीय हालचालींमुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष आहे. या मुद्द्यावरून नगरसेवक प्रशासनाला धारेवर धरण्याच्या तयारीत आहेत. तीन वर्षांचा फरक (डिफरन्स) रद्द करावा आणि ही कर आकारणी शिथिल करावी, अशी आक्रमक मागणी नगरसेवकांकडून केली जाणार आहे.
मालमत्ता कराच्या मुद्याव्यतिरिक्त शहरातील रस्त्यांची झालेली दुर्दशा, ठिकठिकाणी खड्ड्यांमुळे होणारी वाहतुकीची कोंडी, अस्वच्छता, पावसाळ्यात तुंबणारे नाले, अपुरा पाणीपुरवठा आणि बंद असलेले पथदिवे यांसारख्या नागरी समस्यांवरूनही नगरसेवक प्रशासनावर तुटून पडणार आहेत.
प्रशासकीय राजवटीत आणि त्यानंतरही नागरिकांना भेडसावणार्‍या मूलभूत सुविधांच्या प्रश्नांकडे प्रशासनाने केलेले दुर्लक्ष यावर आजच्या सभेत जोरदार चर्चा आणि घोषणाबाजी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.आजच्या आमसभेत विरोधकांसोबतच सत्ताधारी पक्षाचे नगरसेवकही आपल्या प्रभागातील समस्या आणि प्रशासनाचा कारभार यावरून आक्रमक पवित्रा घेणार आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाला नगरसेवकांच्या प्रश्नांचा आणि रोषाचा सामना करताना मोठी दमछाक होणार आहे. महापालिका प्रशासन यावर काय उत्तर देते आणि नागरिकांना दिलासा देणारा कोणता निर्णय घेते, याकडे संपूर्ण अमरावती शहराचे लक्ष लागले आहे.

अमरावतीकरांचे लक्ष आजच्या निर्णयाकडे
आज होणार्‍या आमसभेत केवळ राजकीय खडाजंगी न होता नागरिकांना थेट दिलासा देणारे निर्णय व्हावेत, अशी अपेक्षा अमरावतीकर व्यक्त करत आहेत. मालमत्ता करातील वाढीव फरक माफ करणे किंवा हफ्ते पाडून देणे, यासारखे पर्याय समोर आणून नगरसेवक नागरिकांची बाजू कशी लावून धरतात, यावर आजच्या सभेचे यश अवलंबून असणार आहे.

संबंधित बातम्या

Back to top button