शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत
शैक्षणिक साहित्य वाटप

शिक्षक शिवलाल बोरकर यांचा सेवानिवृत्ती सत्कार
अंजनगाव बारी/3 जुलै : वडगाव जिरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी विविध उपक्रमांचे आयोजन उत्साहात करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात विद्येची देवता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी इयत्ता पहिलीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले तसेच इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियानांतर्गत शैक्षणिक गणवेश, पाठ्यपुस्तके, वही, पाण्याच्या बाटल्या व इतर शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मनोहर मारोडकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप करण्यात आले. याच प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक शिवलाल बोरकर यांच्या सेवानिवृत्ती निमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या सन्मानार्थ विद्यार्थ्यांसाठी स्नेहभोजनाचे आयोजनही करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहशिक्षिका निशा सोयाम यांनी मोलाचे योगदान दिले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मनोहर मारोडकर, सहशिक्षिका निशा सोयाम, आशाताई, वंदना रामटेके तसेच किसनराव मात्रे, शरदराव ब्राह्मणे, पुनम वासनिक, जनार्धन लाहाबर यांच्यासह ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




