रस्त्याची अक्षरशः झाली चाळण : वाहन चालविणे धोकादायक

शहरातील न्यायालयाकडे जाणार्‍या मार्गाची दुर्दशा : नागरिक त्रस्त

वरुड /3 जुलै- जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाकडे जाणारा तसेच शहरातील मुख्य वस्त्यांना जोडणारा महत्त्वाचा रस्ता गेल्या काही वर्षांपासुन निकृष्ट दर्जाच्या कामामुळे अत्यंत खराब अवस्थेत पोहोचला आहे. ठिकठिकाणी मोठे खड्डे, उखडलेला डांबरी थर आणि पावसामुळे साचणारे पाणी यामुळे नागरिक, वकील, न्यायालयीन कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना दररोज मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
या रस्त्याचे काम काही वर्षांपूर्वी करण्यात आले होते. मात्र, कामाच्या दर्जाबाबत सुरुवातीपासूनच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. आज परिस्थिती अशी आहे की संपुर्ण रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून पावसाळ्यात वाहन चालविणे धोकादायक बनले आहे. दुचाकीस्वार घसरुन अपघात होण्याच्या घटना घडण्याची शक्यता वाढली असुन पादचार्‍यांनाही जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
विशेष म्हणजे हा रस्ता न्यायालयाकडे जाणारा असल्याने दररोज शेकडो नागरिक, वकील आणि अधिकारी या मार्गाचा वापर करतात. शहरातील अनेक निवासी वस्त्यांनाही हा रस्ता जोडत असल्याने वाहतुकीची मोठी वदर्ळ असते. तरीही संबंधित यंत्रणेकडून कायमस्वरूपी दुरुस्ती करण्यात आलेली नाही.
स्थानिक नागरिकांनी या रस्त्याची तातडीने उच्च दर्जाने पुनर्बांधणी करण्याची मागणी केली आहे. निकृष्ट दर्जाचे काम करणार्‍या संबंधित ठेकेदाराची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याची मागणी जनतेनी केली होती परंतु चोर चोर मावस भाऊ एक मेकांचा बचाव करत गेले परंतु पुढे नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार रस्ता उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे. वरुड येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाकडे जाणारा रस्ता पावसाळ्यात खड्ड्यांनी व्यापला असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

Back to top button