वरुडच्या आश्रमशाळेचा देशात दुसरा क्रमांक

माणिकपूरच्या विद्यार्थ्यांनी फडकवला दिल्लीत झेंडा

वरुड/6 सप्टेंबर  – दुर्गम भागात शिकणार्‍या आदिवासी लेकरांनी थेट देशाच्या राजधानीत आपल्या मातीचा झेंडा फडकवून नवा इतिहास घडवला. भारतीय उद्योग महासंघाच्या दहाव्या शालेय शिक्षण परिषदेत अमरावती जिल्ह्यातील वरुड नजीकच्या माणिकपूर शासकीय माध्यमिक आश्रमशाळेने देशात दुसरा क्रमांक पटकावून मोठी कमाल केली. देशभरातील शेकडो नामांकित खाजगी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांना मागे टाकत एका साध्या मराठी आश्रमशाळेने मारलेली ही मजल संपूर्ण महाराष्ट्राचा गौरव वाढवणारी ठरली.
नवी दिल्ली येथील दि ललित या पंचतारांकित हॉटेलमध्ये ही राष्ट्रीय परिषद पार पडली. या परिषदेचे उद्घाटन माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी भारतीय उद्योग महासंघाचे महासंचालक चंद्रजित बॅनर्जी, शालेय मंचाच्या अध्यक्षा मीनाक्षी सिंग यांच्यासह अनेक शिक्षणतज्ज्ञ हजर होते. शालेय स्तरावर व्यावसायिक शिक्षण कसे द्यावे या विषयावर राष्ट्रीय सादरीकरण स्पर्धा रंगली होती. यात देशभरातून निवडलेल्या अव्वल पाच शाळांमध्ये चार मोठ्या केंद्रीय मंडळाच्या शाळा आणि एकमेव माणिकपूरची ही मराठी आश्रमशाळा आमनेसामने आल्या.
मुख्याध्यापक जी. बी. तेलमोरे यांच्या मार्गदर्शनात शिक्षक एन. डी. काळे, व्ही. बी. सोने यांनी आदिवासी मुलांना स्वावलंबी बनवणार्‍या व्यावसायिक शिक्षणाचा खराखुरा नमुना प्रभावीपणे मांडला. परीक्षकांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक करत शाळेला राष्ट्रीय पातळीवर उपविजेता म्हणूनगौरव केला. एका खेड्यातील मराठी शाळेने दिल्लीत मिळवलेल्या या मोठ्या यशाबद्दल शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांवर सर्व स्तरातून कौतुकाचा मोठा वर्षाव होत आहे.

Back to top button