माजी आ. श्रीकांत देशपांडे यांच्या गाडीला अपघात
शेगाव तालुक्यातील खेर्डा गावाजवळील घटना

नीलगाय वाचवताना गाडीवरील नियंत्रण सुटले
सुदैवाने चौघे सुखरूप बचावले
शेगाव/6 सप्टेंबर – बुलढाणा जिल्ह्यात येत असलेल्या शेगाव तालुक्यातील खेर्डा गावाजवळ अमरावतीचे रहिवासी व माजी आ. श्रीकांत देशपांडे यांच्या चारचाकी वाहनाला भीषण अपघात घडला असून रस्त्यात अचानक आडवे आलेले जनावर वाचवताना गाडी वीस ते पंचवीस फूट खोल खड्ड्यात उलटली, मात्र दैव बलवत्तर असल्यानेमाजी आ. देशपांडे यांच्यासह गाडीतील चौघेही या मोठ्या संकटातून बालंबाल बचावल्याने अनर्थ टळला.
मिळालेल्या माहितीनुसार, माजी आ. श्रीकांत देशपांडे हे आपल्या सहकार्यांसह जळगावकडून शेगावकडे येत होते. गाडी खेर्डा शिवारात आली असता रस्त्यावर अचानक एक नीलगाय आडवी धावून आली. तिला वाचवण्याच्या नादात चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. गाडी भरधाव असल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या वीस ते पंचवीस फूट खोल खड्ड्यात जाऊन जोरात उलटली.
गाडी उलटल्याचा मोठा आवाज होताच परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. गावकर्यांनी तत्परता दाखवून गाडीत अडकलेल्या माजी आ. देशपांडे आणि इतर तीन जणांना तातडीने बाहेर काढले. दणका मोठा बसूनही आत बसलेल्या सर्वांना केवळ किरकोळ दुखापती झाल्या. गाडीचे मोठे नुकसान झाले असले तरी चौघेही सुरक्षित राहिल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.





