आयोगातल्या व्यक्तीलाही कठोर शिक्षा होईल

मुख्यमंत्री फडणवीसांचा विद्यार्थ्यांना शब्द

मुंबई /6 सप्टेंबर : देशातील नीट पेपरफुटीनंतर देशभरात मोठं आंदोलन झाल्याचं पाहायला मिळालं, दिल्लीतील जंतरमंतरवर झालेल्या आंदोलनास देशभरातून पाठिंबा मिळाल्याने अखेर केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा घेण्यात आला. मात्र, त्यानंतरही महाराष्ट्रात सीईटी आणि  MPSC पेपरफुटीच्या (MPSC) घटना घडल्या. सर्वात पारदर्शक आणि विश्वासार्ह परीक्षा म्हणून एमपीएससीकडे पाहिले जाते. मात्र, एमपीएससीच्या औषध निरीक्षकपदासाठीचा पेपर फुटल्याने पुन्हा एकदा पेपरफुटी चव्हाट्यावर आली. याप्रकरणी, पोलिसांनी आत्तापर्यंत 6 हून अधिक आरोपींना अटक केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर स्पर्धा परीक्षा शिक्षक आणि विद्यार्थी शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली.
एमपीएससी परीक्षा पद्धती संदर्भात स्पर्धा परीक्षा शिक्षकआणि विद्यार्थ्यांचे एक शिष्टमंडळ आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली. यावेळी, विद्यार्थ्यांनी काही मागण्या केल्या. यामध्ये शिक्षक सचिन ढवळे, यशवंत सोलाट, धनंजय मते, गणेश कड, उमेश कुदळे, विद्यार्थी चळवळीतील कार्यकर्ते निखिल पाटील यांच्यासह स्पर्धा परीक्षा शिक्षक-विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या मागण्यांना प्राधान्यक्रम देत, चझडउ पेपरफुटीच्या गैरप्रकारात आयोगातील किंवा आयोगाबाहेरील ज्या व्यक्तींचा सहभाग आढळेल, त्या सर्वांना कठोर शिक्षा केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांतनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले की, अतिशय पारदर्शी पद्धती विकसित करण्यासाठी सरकार सातत्याने काम करते आहे. ही प्रक्रिया अधिक कशी सुदृढ करता येईल यासाठी राज्यस्तरावर एक उच्चस्तरीय समिती सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली गठित करण्यात आली आहे. त्यात युपीएससीचे माजी सदस्य, पोलिस महासंचालक, आयआयटी प्राध्यापक आणि इतर अधिकार्‍यांचा समावेश आहे. त्याचा शासन आदेश सुद्धा निर्गमित करण्यात आला असून ही समिती राज्यभर सर्व विभागात जाऊन विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि सर्व संबंधितांशी सल्लामसलत प्रक्रिया करणार आहे. पुण्यात सुद्धा ही समिती जाईल. एकीकडे हे प्रयत्न होत असताना काही कठोर कायदे सुद्धा करण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणार्‍यांवर सरकार कठोर कारवाई करेल.

Back to top button