सख्ख्या भावानेचं केला लहान भावाचा खून

खोलीत कोंडून लोखंडी सळईने सपासप वार

पार्डी चौक परिसरातील धक्कादायक घटना
वरुड पोलिसांकडून आरोपी भावास अटक

वरुड /6 सप्टेंबर- दारू पिण्याच्या पैशांवरून दोन सख्ख्या भावांमध्ये उडालेल्या जोरदार वादाचे पर्यवसान अखेर खुनात झाल्याची थरारक घटना वरुड शहरातील पार्डी चौक भागात घडली. मोठ्या भावाने लहान भावाला खोलीत डांबून लोखंडी सळईने केलेल्या जबर हल्ल्यात लहान भावाचा मृत्यू झाला असून, माहेरहून परतलेल्या पत्नीच्या तक्रारीवरून पोलिसांनी मारेकरी भावाला बेड्या ठोकल्या आहेत.
पार्डी चौक परिसरात गजानन अनिल काळे आणि मोहन अनिल काळे हे दोन सख्खे भाऊ कुटुंबीयांसह राहतात. दोघांनाही दारूचे भयंकर व्यसन असल्याने घरात नेहमीच पैशांवरून कुरबूर चालायची. काल पाच तारखेला दुपारी पुन्हा दारूच्या पैशांवरून दोघांत कडाक्याचे भांडण सुरू झाले. वादाच्या भरात लहान भाऊ मोहन काळे यांनी मोठ्या भावाला शिवीगाळ केली. या शिवीगाळीमुळे मोठा भाऊ गजानन अनिल काळे याचा पारा चांगलाच चढला. रागाच्या भरात गजाननने लहान भाऊ मोहनला ओढत नेऊन घराच्या खोलीत कोंडले. त्यानंतर खोलीत पडलेली जाड लोखंडीसळई उचलून मोहन यांच्या अंगावर, डोक्यावर सपासप वार केले.
या जीवघेण्या हल्ल्यात पस्तीस वर्षीय मोहन काळे रक्ताच्या थारोळ्यात पडले. गंभीर जखमी झालेल्या मोहन यांना उपचारासाठी घाईघाईने एका खासगी दवाखान्यात नेण्यात आले. मात्र प्रकृती नाजूक असल्याने तिथे उपचार मिळू शकले नाहीत, त्यामुळे त्यांना पुन्हा घरी आणून ठेवण्यात आले. रात्री उशिरापर्यंत घरी पडून राहिलेल्या मोहन यांनी अखेर घरातच तडफडून अखेरचा श्वास घेतला. भावाचा जीव गेल्यानंतरही आरोपीने पोलिसांत कसलीच वाच्यता केली नाही.
घरगुती भांडणामुळे मृतक मोहन काळे यांची पत्नी काजल मोहन काळे या गेल्या दोन वर्षांपासून माहेरी राहत होत्या. पतीच्या गंभीर मारहाणीची कुणकुण लागताच त्या तात्काळ सासरी पोहोचल्या. पती रक्ताळलेल्या अवस्थेत निपचित पडल्याचे पाहताच त्यांनी थेट वरुड पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. पोलिसांनी तातडीने खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपी गजानन अनिल काळे याला अटक केली. दारूच्या एका व्यसनाने सुखी संसाराची राखरांगोळी केल्याने वरुड परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.

Back to top button