गणेश उत्सवात दंगली घडवल्या जातील
राज ठाकरे यांचे खळबळजनक वक्तव्य

डीजेवरूनही सरकारवर हल्लाबोल
मुंबई/6 सप्टेंबर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राज्यस्तरीय पदाधिकारी मेळावा ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृहात झाला. या मेळाव्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खळबळजनक दावा केला असून, गणेशोत्सवात दंगल घडवण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
ठाकरे म्हणाले, देशातील प्रश्नांना बगल देण्यासाठी दंगली घडवण्याचा डाव आहे. त्यासाठी मोठी यंत्रणा राबवली जात आहे. पण भाजपमधील लोक त्यावर बोलू शकत नाहीत, या राज्याचे नागरीक म्हणून तुम्ही सतर्क राहा. जाणीवपूर्वक ते हे करतील, तुम्ही या गोष्टीपासून दूर राहा. सोशल मीडियावर पण हा मुद्दा चर्चेत आहे.आता 14 तारखेला गणपती येतील. मला सर्वाधिक भीती आहे की, गणपतीच्या दिवसातदंगली घडवल्या जातील. केवळ महाराष्ट्रात नाही म्हणत मी, देशात दंगली घडवल्या जातील, जेणेकरून तुम्ही त्यात अडकले पाहिजे, तुमचे इतर गोष्टीकडे दुर्लक्ष झाले पाहिजे. आताच मुंबईत त्याची झलक पाहिली तुम्ही. एक दोन घटना घडल्या. ही सुरुवात आहे.
जो सुजाण हिंदू आहे. जो सुजाण मुस्लिम आहे. दोघांनाही सांगायचे की सतर्क राहा. आपल्या नावाने, त्यांच्या नावाने यामध्ये कुणीतरी घुसवतील आणि दंगली घडवतील. हकनाक आपली पोरे जातील, त्यांची पोरे जातील. तिकडेच लक्ष जाईल तुमचे. मूळ परिस्थितीकडे दुर्लक्ष करायला लावणे इतकाच कार्यक्रम आता सुरू आहे. आता देशाची परिस्थिती अत्यंत वाईट आहे,असा दावा ठाकरे यांनी केला.
तसेच, पुण्यातील डीजे वादावर ठाकरे यांनी म्हटले की, पुण्यात आता जे सगळ सुरू आहे, डीजे वाजवायचा की नाही वगैरे, सगळे वाद सुरू आहेत. या विषयावरती मुख्यमंत्री काय बोलले, मला अजून नाही कळले. माझी बातमी जर चुकीची असेल तर नागपुरात डीजे बंद झाला, बाकी महाराष्ट्रामध्ये आहे.याच्यावरती मुख्यमंत्री सांगतात कायद्याने आम्हाला बंदी नाही आणता येत, मग नागपुरात कसे बंद झाले? याचे कारण तुम्ही डीजेच्या वादात गुंतता डॉल्बीच्या वादात गुंतता, तुम्ही हेच बोलत राहा, सतत, बाकीच्या सगळ्या गोष्टींकडे तुमचे दुर्लक्ष होऊ देत, शिक्षण मिळते का? नाही मिळत, नोकर्या मिळतात का? नाही मिळत, नोकर्या मिळाल्या तर टिकणार की, नाही टिकणार माहित नाही, असेही ठाकरे यांनी म्हटले.





