दिल्लीत 5 मजली इमारत कोसळली; 5 विद्यार्थ्यांचा मृत्यू

बेसमेंटमध्ये सुरू होते खोदकाम

अनेक जण ढिगार्‍याखाली दबल्याची भीती
मालक आनंद बन्सलविरोधात एफआयआर दाखल

नवी दिल्ली/6 सप्टेंबर ; देशाची राजधानी दिल्लीतील उच्चशिक्षित विद्यार्थ्यांचे केंद्र मानल्या जाणार्‍या सत्य निकेतन परिसरात रविवारी एक अत्यंत भीषण आणि काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना घडली आहे. सुमारे 40 ते 50 वर्षे जुनी असलेली 5 मजली इमारत अचानक पत्त्यासारखी कोसळली. या इमारतीत दिल्ली विद्यापीठासह विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी पेइंग गेस्ट म्हणून राहत होते. या दुर्घटनेत 5 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून, अनेक विद्यार्थी आणि नागरिक ढिगार्‍याखाली दबले गेले आहेत. जखमींना तात्काळ एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. घटनेच्या वेळी इमारतीच्या तळघरात अनधिकृत दुरुस्ती आणि खोदकामाचे काम सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, अपघाताच्या वेळी विद्यार्थी त्यांच्या खोल्यांमध्ये होते आणितळघरात खोदकाम सुरू होते. बारा जणांना वाचवण्यात आले आहे. या इमारतीत वसतिगृह चालवले जात होते.इमारतीचे मालक आनंद बन्सल असून ते गुरुग्राममध्ये राहतात. पोलिसांनी सदोष मनुष्यवध आणि निष्काळजीपणाच्या कलमांखाली एफआयआर दाखल केला आहे.जखमींना तातडीने एम्स ट्रॉमा सेंटरमध्ये नेण्यात आले, त्यापैकी 5 विद्यार्थ्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. इतर जखमींवर उपचार सुरू आहेत.
ढिगार्‍याखाली दबलेल्या एका विद्यार्थ्याने मोबाईलवरून स्वतःचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर शेअर करत ’मला वाचवा’ अशी आर्त हाक दिली. घटनास्थळी उपस्थित असलेल्या त्याच्या मित्राने सांगितले की, तो ढिगार्‍याखालून फोन करून सातत्याने मदतीची याचना करत होता.
या दुर्घटनेनंतर देशातील राजकीय वर्तुळातूनही तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ’एक्स’वर (ट्विटर) पोस्ट करत शोक व्यक्त केला. त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री, पोलीस आयुक्त आणि एनडीआरएफच्या महासंचालकांशी थेट फोनवरून चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला आणि मदतकार्य अधिक वेगवान करण्याचे निर्देश दिले. सध्या एनडीआरएफच्या पथकांकडून ढिगारा हटवण्याचे काम वेगाने सुरू असून मलब्याखाली अजूनही काही विद्यार्थी अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे

Back to top button