हरवलेले 20 मोबाईल मूळ मालकांच्या स्वाधीन
दर्यापूर पोलिसांच्या कार्याची सर्वत्र प्रशंसा

दर्यापूर /3 जुलै : नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ करणारी उल्लेखनीय कामगिरी दर्यापूर पोलीस स्टेशनने केली आहे. हरविलेल्या तब्बल 20 मोबाईलचा शोध घेऊन ते त्यांच्या मूळ मालकांना परत देण्यात आल्याने संबंधित नागरिकांच्या चेहर्यावर पुन्हा आनंद फुलला. मोबाईल परत मिळण्याची आशा जवळपास संपलेली असताना पोलिसांच्या अथक प्रयत्नांमुळे हा उपक्रम यशस्वी ठरला.
ही संपूर्ण कारवाई अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली, अप्पर पोलीस अधीक्षक दत्ता तोटेवार यांच्या सहकार्याने तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी यांच्या नेतृत्वात राबविण्यात आली. दर्यापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत विविध ठिकाणी हरविलेले मोबाईल शोधण्यासाठी तांत्रिक तपास, सीईआयआर (उएखठ) प्रणालीचा वापर आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा करण्यात आला. या प्रयत्नांना यश मिळाल्यानंतर हरविलेले 20 मोबाईल हस्तगत करण्यात आले.त्यानंतर दर्यापूर पोलीस स्टेशन येथे आयोजित कार्यक्रमात उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी यांच्या हस्ते संबंधित नागरिकांना त्यांचे मोबाईल परत करण्यात आले. अनेकांनी आपला मौल्यवान मोबाईल, डेटा, कागदपत्रे आणि आठवणी पुन्हा मिळाल्याने त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला सर्वांनी पोलिसांचे मनापासून आभार मानले. पोलिसांच्या या लोकाभिमुख कार्याची नागरिकांमधून शहरात सर्वत्र प्रशंसा होत आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक अजित राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार सचिन जाधव, लखन होलगरे तसेच सायबर पोलीस स्टेशनचे हवालदार राठोड यांनी अथक परिश्रम, तांत्रिक कौशल्य आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा करून पूर्ण केली. त्यांच्या मेहनतीमुळे हरविलेले मोबाईल शोधून मूळ मालकांपर्यंत पोहोचविणे शक्य झाले.
यावेळी दर्यापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अजित राठोड यांनी नागरिकांना महत्त्वाचे आवाहन केले. मोबाईल हरविल्यास किंवा चोरीला गेल्यास वेळ न दवडता तात्काळ उएखठ पोर्टलवर नोंदणी करावी. तसेच जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी. नागरिकांच्या सहकार्यामुळे हरविलेले मोबाईल शोधणे अधिक सोपे होते आणि ते मूळ मालकांना परत मिळवून देणे शक्य होते.




