उद्योजक किशोर काकाणी यांचा अपघातात मृत्यू

अमरावती-अकोला मार्गावरील लोणीजवळील दुर्घटना

ट्रक-कारच्या धडकेत कारचा चक्काचूर; अमरावतीच्या काकाणी कुटुंबावर शोककळा

अमरावती /18 ऑगस्ट- अकोला राष्ट्रीय महामार्गावरील लोणीजवळ भीषण अपघात घडून अमरावतीचे प्रसिद्ध शासकीय कंत्राटदार आणि उद्योजक किशोर काकाणी यांचा जागीच मृत्यू झाला. मंगळवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास कामरगाववरून अमरावतीला परतताना अकोल्याकडे जाणार्‍या भरधाव ट्रकने दुभाजक ओलांडून त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात कारचा अक्षरशः चुराडा झाला. किशोर काकाणी यांचा मृतदेह कारमध्येच अडकल्याने पोलिसांनी शर्तीचे प्रयत्न करून तो बाहेर काढला आणि उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवला. या दुर्दैवी घटनेमुळे अमरावती आणि कामरगाव परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
मूळचे कामरगावचे रहिवासी असलेले 63 वर्षांचे किशोर काकाणी सध्या अमरावतीतील बियाणी कॉलेज, दसरा मैदान समोर राहत होते. ते पारस हॉस्पिटलचे संचालक डॉ. श्रीगोपाल राठी यांचे मेहुणे आणि ज्येष्ठ माजी भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी सुरेश काकाणी यांचे लहान भाऊ होते. मंगळवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास काकाणी कामरगाववरून अमरावतीकडे येत असताना हॉटेल अतिथीजवळ हा भीषण अपघात घडला.अपघाताचा मोठा आवाज ऐकून हॉटेलमधील ग्राहक आणि रस्त्याने जाणार्‍या वाहनधारकांनी लगेच घटनास्थळाकडे धाव घेतली. लोणी पोलिसांना याची माहिती दिल्यानंतर ठाणेदार सानप आपल्या सहकार्‍यांसह तातडीने दाखल झाले. अपघाताची माहिती मिळताच डॉ. श्रीगोपाल राठी यांनीही लगेच घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. काकाणी यांच्या पश्चात पत्नी, डॉ. प्रतीक व डॉ. शुभम ही दोन मुले, मोहनलाल, द्वारकाप्रसाद व सुरेश हे तीन भाऊ, सुशीला व डॉ. निर्मल राठी या दोन बहिणी, सुना आणि नातवंडे असा मोठा आप्तपरिवार आहे.

लोणीजवळचा महामार्ग बनला मृत्यूचा सापळा
कामरगाववरून अमरावतीला परतताना भरधाव ट्रकने अचानक दुभाजक ओलांडून काकाणी यांच्या कारला भीषण धडक दिली. धडक एवढी जोरदार होती की कारचा चक्काचूर झाला आणि काकाणी कारमध्येच अडकले. लोणी पोलिसांनी अथक प्रयत्नांनंतर त्यांचा मृतदेह बाहेर काढून रुग्णालयात पाठवला. या घटनेने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Back to top button