अमरावतीत बनावट घड्याळांचा मोठा साठा जप्त
जवाहर गेट, राजकमल चौकात पोलिसांची धडक कारवाई

अमरावती/17 ऑगस्ट – शहरात नामांकित कंपन्यांच्या नावाने बनावट घड्याळांची विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर शहर कोतवाली आणि खोलापुरी गेट पोलिसांनी एकाच दिवशी तीन दुकानांवर कारवाई करून एकूण 3 लाख 57 हजार रुपयांचा बनावट माल जप्त केला. जवाहर गेट परिसरातील एका दुकानातून 159 घड्याळे तर राजकमल चौकातील दुकानातून 178 घड्याळे जप्त करण्यात आली. याशिवाय खोलापुरी गेट परिसरातील दुकानातून 129 घड्याळे आणि 25 घड्याळांचे पट्टे ताब्यात घेण्यात आले.
जवाहर गेट येथील मनपा संकुलातील सनराईज ऑप्टिकलमधून 47 हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला. राजकमल चौकातील बेंग माडिवाले संकुलातील चावंडे वॉच ऑप्टिकलमधून 2 लाख रुपयांचा माल मिळाला. याप्रकरणी मुदस्सीर शाह अकबर शाह (36), अमर रामभाऊ चावंडे (42) आणि हिदायत एजाज खान (35) यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ही कारवाई टायटन कंपनीच्या अधिकृत तपास अधिकारी सुजीत सुरेश खंडाळे (47) यांच्या तक्रारीवरून करण्यात आली. खोलापुरी गेटमधील डायमंड वॉच स्टोअर्समधूनही 1 लाख 11 हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला. पुढील तपासात बनावट घड्याळांचा पुरवठा कुठून होत होता आणि यामागे मोठे जाळे आहे का, याचा शोध घेतला जात आहे.
जप्त मालावर पोलिसांची नजरपोलिसांनी जप्त केलेल्या घड्याळांची तपासणी सुरू केली असून खरेदी-विक्रीच्या कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे. बनावट मालाचा पुरवठा करणार्यांपर्यंत पोहोचण्यासाठी संबंधितांची चौकशी सुरू आहे.




