कोणार्क व नैकॉफचा निर्णय आगामी बैठकीपर्यंत लांबणीवर

अमरावती मनपा स्थायी समितीच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय

स्ट्रीट लाईटच्या देखभाल दुरुस्तीसाठी 1.92 कोटी मंजूर

अमरावती /17 जुलै अमरावती महानगरपालिकेच्या स्थायी समितीची बैठक अध्यक्ष अविनाश मार्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. स्व. सुदामकाका देशमुख सभागृहात झालेल्या या बैठकीत शहरातील विविध विकासकामांना हिरवा कंदील दाखवण्यात आला. मात्र, शहर स्वच्छतेशी संबंधित कोणार्क कंपनीचा कंत्राट प्रस्ताव आणि नैकॉफ कंपनीचा मनुष्यबळ पुरवठा प्रस्ताव यावर सविस्तर चर्चा होऊनही सदस्यांनी अधिक माहिती मागवल्यामुळे हे दोन्ही निर्णय तूर्तास लांबणीवर टाकण्यात आले आहेत. बैठकीत शहरातील सार्वजनिक सुविधा आणि प्रशासकीय कामांना गती देण्यावर भर देण्यात आला असून, काही महत्त्वाच्या प्रस्तावांना तत्काळ मंजुरी देण्यात आली आहे. शहरातील रस्त्यांवरील विद्युत व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी 1 कोटी 92 लाख रुपयांच्या देखभालीच्या कामाला समितीने मंजुरी दिली आहे. कंत्राटदार ब्राइट कंपनीला प्रत्येक झोनमध्ये किमान तीन देखभाल वाहने तैनात ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यासोबतच शहरातील जुने पिवळे बल्ब काढून तिथे नवीन एलईडी दिवे बसवणे, खराब वायरिंग दुरुस्त करणे आणि जीर्ण खांबांची तातडीने डागडुजी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. नागरिकांना रात्रीच्या वेळी उत्तम प्रकाश मिळावा आणि अपघातांचे
प्रमाण कमी व्हावे, यासाठी ही तरतूद करण्यात आली आहे. अग्निशमन विभागाच्या भिंमोरा परिसरातील नवीन इमारतीसाठी 99 लाख रुपयांच्या विद्युत फिटिंग आणि संबंधित कामांनाही या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. कामाचा दर्जा राखत निर्धारित वेळेत काम
पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. महानगरपालिका मुख्यालयातील जन्म-मृत्यू दाखले विभागात सध्या जागा अपुरी पडत असल्याने नागरिकांसह कर्मचार्‍यांची गैरसोय होत आहे. हे लक्षात घेता नेहरू मैदान परिसरातील महानगरपालिका शाळा इमारतीची डागडुजी करून तिथे सोयीसुविधा विकसित कराव्यात आणि जन्म-मृत्यू विभागासह इतर काही विभाग तिथे हलवावेत, असा निर्णय घेण्यात आला. या विभागासाठी नवीन संगणक आणि प्रिंटर खरेदीच्या प्रस्तावालाही मंजुरी देण्यात आली आहे. शहरातील मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर चिंता व्यक्त करत, नसबंदीचे काम करणार्‍या कंत्राटदाराला अधिक कार्यक्षमतेने काम करण्याच्या सक्त सूचना
देण्यात आल्या आहेत. कुत्र्यांच्या नसबंदी मोहिमेच्या खर्चावरून काही सदस्यांनी उपस्थित केलेले प्रश्न आणि कामाच्या गुणवत्तेबाबत घेतलेली आक्षेपार्ह भूमिका पाहता, या मोहिमेच्या आढाव्याची गरज समितीने व्यक्त केली आहे. मोकाट कुत्र्यांना पकडून शहराबाहेर सुरक्षित स्थळी सोडण्याबाबतही यावेळी चर्चा झाली.

मोकाट कुत्र्यांच्या नसबंदी मोहिमेवर प्रश्नचिन्ह
शहरातील मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे नागरिक हैराण आहेत. महापालिकेकडून नसबंदीसाठी 47 लाख रुपयांचा खर्च केला जात असतानाही, पशुवैद्यकीय अधिकार्‍यावर 25 लाख रुपयांच्या लाचेचा आरोप झाल्याने कामाच्या पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह
निर्माण झाले आहे. या गंभीर प्रकारामुळे स्थायी समितीने नसबंदी मोहिमेच्या गुणवत्तेवर आणि आर्थिक व्यवहारांवर सखोल आढावा घेण्याचे निर्देश दिले असून, मोकाट कुत्र्यांच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे आव्हान आता प्रशासनासमोर आहे.

संबंधित बातम्या

Back to top button