माहूरच्या ’रेणुका माता तांबुल’ प्रसादाला मिळाले जीआय मानांकन

तिरूपतीच्या लाडूनंतर बहुमान

 माहूरच्या धार्मिक पर्यटनाला जागतिक स्तरावर गती

माहूर /17 जुलै : महाराष्ट्राच्या समृद्ध धार्मिक आणि सांस्कृतिक वारशाला राष्ट्रीय स्तरावर एक अत्यंत मोठी आणि ऐतिहासिक नवी
ओळख मिळाली आहे. साडेतीन शक्तीपीठांपैकी प्रमुख मूळ पीठ असलेल्या तीर्थक्षेत्र माहूर गडावरील श्री रेणुका माता मंदिरामध्ये देवीला नैवेद्य म्हणून अर्पण केल्या जाणार्‍या पारंपरिक ’रेणुका माता तांबुल’ या प्रसादाला केंद्र सरकारने अधिकृत भौगोलिक मानांकन बहाल केले
आहे. यामुळे माहूरचा तांबुल हा देशात तिरुपती लाडू प्रसादानंतर जीआय मानांकन मिळवणारा दुसरा, तर महाराष्ट्रातील पहिलाच मानांकनप्राप्त प्रसाद ठरला आहे. या यशामुळे माहूरच्या धार्मिक पर्यटनाला जागतिक स्तरावर एक मोठी गती मिळण्याची नवी पहाट उजाडली आहे. लोकपरंपरेनुसार आणि प्राचीन ग्रंथांमधील संदर्भांनुसार, श्री रेणुका मातांनी त्यांचे निस्सीम भक्त श्री विष्णुकवी महाराजांना स्वप्नात दृष्टांत देऊन तांबुलाचा नैवेद्य सुरू करण्याची दैवी आज्ञा दिली  त्यानंतर ही पवित्र परंपरा आजही अखंडपणे सुरू असून मंदिरात दररोज सकाळपासून रात्रीपर्यंत तांबुल तयार करण्याचे कार्य चालते. सध्या गावातील अमोल गावंडे, पांडुरंग राठोड, विशाल चौधरी, संतोष परळकर, अनिल परळकर, अभिषेक परळकर आणि लवकुश जाधव ही सात पारंपरिक सेवेकरी कुटुंबे कोणत्याही व्यावसायिक फायद्याशिवाय ही वारसा परंपरा पिढ्यानपिढ्या जपण्यादचे पवित्र कार्य करत आहेत.माहूरच्या या तांबुलाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये वापरण्यात येणारे पूर्णपणे नैसर्गिक आणि औषधी घटक आहेत. या तांबुलामध्ये नागवेलीची पाने, कात, चुना, सुपारी,
सोप, लवंग, वेलची, जायफळ, जायपत्री, ओवा, धनेदाळ, आस्मान तारा, ज्येष्ठमध आणि चमनबार अशा एकूण 14 नैसर्गिक घटकांचा समावेश असतो. पारंपरिक पद्धतीने हे सर्व साहित्य दगडी खलबत्त्यात एकत्र करून तांबुल तयार करण्यात येतो. आयुर्वेदानुसार या घटकांचे पचनासह मानवी आरोग्यासाठीही प्रचंड महत्त्व असल्याचे मानले जाते, ज्यामुळे हा केवळ धार्मिक प्रसाद न राहता एक औषधी अर्क ठरला आहे.

संबंधित बातम्या

Back to top button