लाचखोर अभियंता बावनगडे एसीबीच्या जाळ्यात

महावितरण अधिकारी 4 हजारांची लाच घेताना अटक

धारणीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

धारणी /8 एप्रिल– मेळघाटातील धारणी येथील महावितरण कार्यालयात भ्रष्टाचाराचा मोठा पर्दाफाश झाला असून, सौर ऊर्जेच्या कामाची संचिका मंजूर करण्यासाठी चार हजार रुपयांची लाच स्वीकारताना सहाय्यक अभियंता सुशांत बावनगडे याला अमरावती येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. शासकीय कामासाठी सामान्य माणसाची अडवणूक करणार्‍या या अधिकार्‍यावर झालेल्या कारवाईमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली असून भ्रष्ट साखळीचे धाबे दणाणले आहेत.
धारणी येथील महावितरणच्या उपविभागीय कार्यालयात सुशांत बावनगडे हा सहाय्यक अभियंता म्हणून कार्यरत आहे. एका तक्रारदाराने त्याच्याकडे सौर ऊर्जेच्या कामाशी संबंधित महत्त्वाची संचिका मंजुरीसाठी दिली होती. मात्र, हे शासकीय काम नियमानुसार विनामूल्य करणे अपेक्षित असताना, बावनगडे याने प्रत्येक संचिकेमागे एक हजार रुपये याप्रमाणे एकूण चार हजार रुपयांची बेकायदेशीर मागणी केली. कष्टाच्या पैशातून उभारलेल्या प्रकल्पाची फाईल अडकवून ठेवल्याने तक्रारदार हतबल झाला होता. मात्र, लाच देण्याऐवजी त्याने भ्रष्ट अधिकार्‍याला धडा शिकवण्याचा निर्धार केला आणि अमरावती येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेऊन तक्रार नोंदवली. या तक्रारीची गुप्तपणे पडताळणी केल्यावर लाच मागितल्याचे तथ्य समोर आले. त्यानुसार विभागाने धारणीत सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारदार पैसे घेऊन गेला असता, चार हजार रुपयांची रोख रक्कम स्वीकारताना पथकाने सुशांत बावनगडे याला झडप घालून ताब्यात घेतले. या कारवाईने शासकीय कार्यालयातील ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आला असून सामान्य जनतेतून समाधान व्यक्त होत आहे. सध्या याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून अमरावती पथक पुढील सखोल तपास करीत आहे.

भ्रष्टाचार्‍यांची आता खैर नाही

धारणी महावितरणमधील याकारवाईने लाचखोर कर्मचार्‍यांचेधाबे दणाणले आहेत. सामान्य
माणसाच्या कामात खोडा घालूनस्वतःचे खिसे गरम करणार्‍यासुशांत बावनगडे याला अखेर
बेड्या ठोकण्यात आल्या असून,लाचलुचपत प्रतिबंधक विभागानेमेळघाटात भ्रष्टाचार करणार्‍यांना
कठोर इशारा दिला आहे

संबंधित बातम्या

Back to top button