टॅटुमुळे नाकारलेली नोकरी अखेर मिळाली
उच्च न्यायालयाच्या आदेशाने तरुणाला न्याय

अचलपूरच्या पियुषचा केंद्रीय दलात प्रवेश
अचलपूर /8 एप्रिल– हातावर असलेल्या गोंदणचिन्हामुळे (टॅटू) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातील नोकरी नाकारल्या गेलेल्या अचलपूर तालुक्यातील रामापूर बेलच येथील पियुष दांडगे या गरीब तरुणाला उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे अखेर न्याय मिळाला आहे. वैद्यकीय चाचणीत अपात्र ठरवल्याने हताश झालेल्या या तरुणासाठी नागपूर खंडपीठाने दिलेला निकाल संजीवनी देणारा ठरला असून, फेर तपासणीनंतर त्याची नियुक्ती निश्चित झाली आहे. कायदेतज्ज्ञ दीपक श्रीचंद खुशलानी यांनी या प्रकरणात केलेल्या प्रभावी पाठपुराव्यामुळे एका सामान्य कुटुंबातील मुलाचे सरकारी नोकरीचे स्वप्न साकार झाले आहे.
अचलपूर तालुक्यातील रामापूर बेलच येथील रहिवासी असलेला पियुष दांडगे हा तरुण अत्यंत गरिबीशी झुंज देत केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या निवड प्रक्रियेत उत्तीर्ण झाला होता. मात्र, शरीर तपासणीच्या वेळी त्याच्या हातावर गोंदण (टॅटू) आढळल्याने नियमांचे कारण पुढे करत त्याला अनफिट म्हणजेच अपात्र घोषित करण्यात आले. कष्टाने मिळवलेली नोकरी हातातून गेल्याने पियुष प्रचंड मानसिक तणावाखाली आला होता. अशा संकटसमयी त्याला परतवाड्यातील कायदेतज्ज्ञ दीपक श्रीचंद खुशलानी यांची साथ लाभली. खुशलानी यांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तातडीने सर्व कागदपत्रांची जुळवाजुळव केली आणि नागपूर येथील उच्च न्यायालय खंडपीठात धाव घेतली.
न्यायालयातील सुनावणी दरम्यान खुशलानी यांनी असा युक्तिवाद केला की, केवळ शरीरावरील एका चिन्हामुळे उमेदवाराची गुणवत्ता नाकारणे अन्यायकारक आहे. निवड प्रक्रियेतील इतर सर्व अटी पूर्ण करणार्या तरुणाला अशा तांत्रिक कारणावरून डावलणे हे नैसर्गिक न्यायाच्या विरोधात असल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. उच्च न्यायालयाने हा युक्तिवाद ग्राह्य धरत केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या संबंधित अधिकार्यांना पियुषची पुन्हा वैद्यकीय तपासणी करण्याचे स्पष्ट आदेश दिले. न्यायालयाच्या या कडक भूमिकेनंतर घेण्यात आलेल्या फेर तपासणीत पियुष पूर्णपणे पात्र ठरला आणि त्याच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला. एका गरीब घरातील मुलाच्या आयुष्याची विस्कटलेली घडी पुन्हा बसवण्यासाठी कायदेशीर लढा यशस्वी ठरल्याने पियुष दांडगे कुटुंबियांनी आणि स्थानिक नागरिकांनी दीपक श्रीचंद खुशलानी यांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली आहे. ग्रामीण भागातील एका जिद्दी तरुणाचा हा विजय सध्या परिसरात कौतुकाचा विषय ठरला आहे.
न्यायाचा विजय…-अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून आलेल्या पियुष दांडगे याला गोंदणामुळे अपात्र ठरवणे अन्यायकारक होते. दीपक श्रीचंद खुशलानी यांनी उच्च न्यायालयात दिलेल्या कायदेशीर लढ्यामुळे पियुषला पुन्हा संधी मिळाली आणि फेर तपासणीत पात्र ठरून तो केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात दाखल झाला. हा एका सत्याचा आणि जिद्दीचा विजय आह




