वंदे मातरम्’चा अपमान केल्यास होणार तुरुंगवास
कठोर कायदा आणण्याच्या तयारीत केंद्र सरकार

पावसाळी अधिवेशनात मांडले जाणार विधेयक
नवी दिल्ली/17 जुलै : राष्ट्रीय गीत असलेल्या ‘वंदे मातरम्’चा अपमान करणे किंवा ते गाताना जाणीवपूर्वक अडथळा निर्माण करणे आता कायदेशीररीत्या गंभीर गुन्हा ठरणार आहे. केंद्र सरकार यासंदर्भात अत्यंत कडक पावले उचलण्याच्या तयारीत असून, आगामी पावसाळी अधिवेशनात यासाठी एक स्वतंत्र आणि कठोर विधेयक संसदेत मांडले जाणार आहे. या नव्या कायद्यानुसार, दोषींना थेट तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागू शकते. संसदेचे आगामी पावसाळी अधिवेशन 20 जुलैपासून सुरू होत असून ते 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणार्या अधिवेशनात मोदी सरकार अनेक मोठी विधेयके पटलावर ठेवणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे ‘वंदे मातरम्’शी संबंधित हे महत्त्वपूर्ण विधेयक सर्वात आधी राज्यसभेत मांडतील.
या विधेयकाचा मुख्य उद्देश ‘वंदे मातरम्’च्या सन्मानाचे रक्षण करणे हा आहे. जर कोणी व्यक्ती हे गीत गात असताना किंवा वाजवले जात असताना मुद्दाम गोंधळ घालत असेल, किंवा त्याचा अवमान करत असेल, तर त्याला या नव्या कायद्यांतर्गत गुन्हेगार मानले जाईल
आणि जास्तीत जास्त 3 वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा सुनावली जाऊ शकेल. गेल्या काही काळापासून ‘वंदे मातरम्’ गायनाबाबत अनेकदा वादविवाद पाहायला मिळाले आहेत. याच पोर्शभूमीवर, केंद्र सरकारने यापूर्वीच सर्व राज्य सरकारांना सरकारी कार्यक्रमांमध्ये ‘वंदे मातरम्’चे गायन किंवा वादन अनिवार्य करण्याबाबत स्पष्ट मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. आता केवळ सूचनांवरन थांबता, सरकार या अनिवार्यतेला थेट कायदेशीर चौकटीत बसवणार आहे. पावसाळी अधिवेशनासाठी सरकारने आखलेल्या रणनीतीनुसार, काही
महत्त्वाचे अध्यादेश लवकरात लवकर मंजूर करून घेण्यावर भर दिला जाईल. यामध्ये ‘वंदे मातरम्’ विधेयकासोबतच आयकर दुरुस्ती विधेयक आणि सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या वाढवण्याबाबतचे विधेयक यांचाही प्राधान्याने समावेश असणार आहे.




