गाडगेबाबांच्या जयंतीलाही पुतळ्याची स्वच्छता नाही

महापालिकेचा असाही कपाळकरंटेपणा

माजी नगरसेवकांनी पुढाकार घेऊन पुतळा धुतला

अमरावती /23 फेब्रुवारी – ज्या कर्मयोगी संत गाडगेबाबांनी आयुष्यभर स्वच्छतेचा संदेश दिला, त्यांच्याच जयंतीदिनी अमरावती महानगरपालिकेने त्यांच्या पुतळ्याची कमालीची अवहेलना केली आहे. शहरातील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात अडगळीत पडलेल्या गाडगेबाबांच्या पुतळ्याची साधी स्वच्छता करण्याची तसदीही प्रशासनाने घेतली नाही. महापालिकेच्या या निगरगट्ट धोरणामुळे संतापाची लाट उसळली असून, अखेर माजी लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन या पुतळ्याची स्वच्छता केली. ज्या महापुरुषाच्या नावाने जिल्ह्याची ओळख आहे, त्यांच्याच जन्मभूमीत आणि कर्मभूमीत झालेली ही विटंबना अत्यंत दुर्दैवी मानली जात असून, मनपाच्या या भूमिकेवर तीव्र टीका होत आहे. सन 1996 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री मनोहरपंत जोशी यांच्या हस्ते संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनाचे भूमिपूजन झाले होते. या वास्तूमध्ये बसवलेला गाडगेबाबांचा पुतळा गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासकीय दुर्लक्षामुळे धूळखात पडला आहे. 23 फेब्रुवारी रोजी जगभर गाडगेबाबांची जयंती साजरी होत असताना, महापालिकेच्या स्वच्छता विभागाने या पुतळ्याकडे पाठ फिरवली. पुतळ्याची झालेली दुरवस्था आणि प्रशासनाचा ढिम्मपणा पाहून माजी सभापती प्रभाताई आवारे, माजी नगरसेवक सुरेश मेश्राम, प्रवीण वासनिक, संजय आठवले आणि डेटाराम मनोजा यांनी स्वतः स्वच्छता मोहीम राबवून पुतळ्याचे पूजन केले.विशेष म्हणजे, जिल्हा युवा पुरस्कार प्राप्त प्रवीण वासनिक यांनी पुतळ्याच्या सौंदर्यीकरणासाठी महापालिका आयुक्तांना वेळोवेळी निवेदने दिली होती. मात्र, प्रशासनाने या मागणीला केराची टोपली दाखवली. पुरोगामी विचारांच्या या थोर पुरुषाच्या पुतळ्याचे सौंदर्यीकरण व्हावे, अशी मागणी आता जोर धरत आहे. महापालिकेने तातडीने याकडे लक्ष न दिल्यास येणार्‍या काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही कार्यकर्त्यांनी दिला आहे.
कार्यकर्त्यांनीच पुतळा धुवून प्रशासनाला झापले

महापालिकेकडे वारंवार तक्रार करूनही पुतळ्याच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाले. अखेर माजी सभापती प्रभाताई आवारे, माजी नगरसेवक सुरेश मेश्राम, संजय आठवले, डेटाराम मनोजा आणि प्रवीण वासनिक यांनी स्वतः बादल्या आणि कापड घेऊन पुतळा स्वच्छ केला. या कृतीतून त्यांनी महापालिकेच्या नाकर्तेपणाचा जाहीर निषेध केला असून सौंदर्यीकरणाची मागणी लावून धरली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button