रंगांच्या उत्सवासाठी बाजारपेठ सजली
होळीच्या साहित्याची बाजारपेठेत मोठी रेलचेल

* आधुनिक पिचकार्यांनी वेधले बालगोपाळांचे लक्ष
* हर्बल रंगांसह खरेदीवर सवलतींचा वर्षाव
अमरावती / 23 फेब्रुवारी : होळीच्या सणाचे काऊंटडाऊन सुरू झाले असून, अमरावतीची मुख्य बाजारपेठ रंगांच्या उधळणीसाठी सज्ज झाली आहे. चित्रा चौक परिसरातील दुकाने सप्तरंगी गुलालाने आणि आधुनिक पिचकार्यांनी ओसंडून वाहत असून, यंदा बाजारात चैतन्याचे वातावरण आहे. विशेषतः लहान मुलांसाठी नवनवीन आकाराच्या पिचकार्या आणि आकर्षक मुखवटे आकर्षणाचे केंद्र ठरत आहेत. सुरक्षित होळी साजरी करण्यासाठी ग्राहकांचा कल हर्बल रंगांकडे असून, विक्रेत्यांनीही ग्राहकांसाठी सवलतींचा मोठा वर्षाव केला आहे. सण जवळ येताच बाजारपेठेत मोठी आर्थिक उलाढाल होत असून, खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाली आहे. रंगांच्या या उत्सवात यंदा आधुनिकतेची जोड मिळाल्याने अमरावतीकरांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.
अमरावतीच्या बाजारपेठेत यंदा होळीच्या निमित्ताने नवनवीन प्रयोगांची रेलचेल पाहायला मिळत आहे. चित्रा चौक परिसरातील विविध प्रतिष्ठानांमध्ये मुलांच्या पसंतीचा विचार करून स्टेनगन, रायफल, क्षेपणास्त्र टँक, त्रिशूळ, गदा, सिलेंडर, शालेय दप्तर आणि बंदूक अशा विविध स्वरूपातील आधुनिक पिचकार्या विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. या पिचकार्या बालगोपाळांना भुरळ घालत असून पालकांचीही खरेदीसाठी लगबग सुरू आहे. रंगांच्या बाबतीत बोलायचे झाले तर, सप्तरंगी गुलालासह विशेष प्रकारचे रंगीबेरंगी कॅप्सूल ग्राहकांना आकर्षित करत आहेत. हिरवा, गुलाबी, निळा, लाल आणि पिवळा अशा सर्वच छटांचा गुलाल बाजारपेठेत मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. केवळ रंग आणि पिचकार्याच नव्हे, तर चेहर्यावर लावण्यासाठी विविध प्रकारचे मुखवटे ही यंदाच्या होळीचे खास आकर्षण ठरत आहेत. यामध्ये वाघ, शनिदेव, महाकाल, नंदी आणि काही भीतीदायक मुखवट्यांचा समावेश असून लहान मुलांकडून याला सर्वाधिक मागणी होत आहे. विशेषतः कार्टून पात्रांवर आधारित पिचकार्या आणि मुखवटे खरेदी करण्यासाठी मुलांचा मोठा आग्रह दिसून येत आहे. नेहमीप्रमाणेच यंदाही आरोग्यदायी होळीवर भर देत विक्रेत्यांनी नैसर्गिक घटकांपासून बनवलेल्या हर्बल रंगांना अधिक प्राधान्य दिले आहे, जेणेकरून सणाचा आनंद घेताना त्वचेला कोणतीही इजा होणार नाही. ग्राहकांना खरेदीमध्ये मोठा दिलासा मिळावा यासाठी बाजारपेठेत विशेष सवलत योजनाही राबवल्या जात आहेत. पिचकारी आणि रंगांच्या खरेदीवर 20 टक्के सवलत देण्यात येत असून, अनेक ठिकाणी पिचकारी खरेदी करणार्या ग्राहकांना रंग विनामूल्य दिले जात आहेत. तसेच, जे ग्राहक मोठ्या प्रमाणात किंवा घाऊक खरेदी करतील, त्यांच्यासाठी 28 टक्के विशेष सूट जाहीर करण्यात आली आहे. होळीच्या या सणाला उत्साहाचे स्वरूप देण्यासाठी सुजित कल्हाणे, दीपक मोहोड, प्रसाद भुयार, गोपाळ श्रीरामराव, आनंद गावंडे, सागर तायडे, प्रदीप गवई आणि आदेश वाकोडे हे सर्वजण ग्राहकांना उत्तम सेवा देण्यासाठी रात्रंदिवस तत्पर आहेत.
सवलतींचा सप्तरंगी धमाका
बाजारपेठेत होळीनिमित्त ग्राहकांसाठी विशेष सवलतींचा पाऊस पडत आहे. पिचकारी आणि रंगांच्या खरेदीवर 20 टक्के थेट सूट मिळत असून, मोठ्या खरेदीवर तब्बल 10 ते 28 टक्के सवलत दिली जात असल्याची माहिती रंग विक्रेता दुकानदारांनी सांगितले आहे. शिवाय, पिचकारी सोबत रंग मोफत मिळत असल्याने ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.




