महिला बाल कल्याण समिती सभापती ममता आवारे यांचा पदग्रहण समारंभ थाटात
आ.सुलभाताई खोडके यांची उपस्थिती

अमरावती /9 एप्रिल: अमरावती महानगरपालिकेच्या महिला व बाल कल्याण समितीच्या सभापतीपदी सौ. ममता संदीप आवारे यांनी आज मोठ्या उत्साहात पदभार स्वीकारला. स्थानिक स्व. सुदामकाका देशमुख सभागृहात आयोजित या भव्य सोहळ्याने महापालिकेच्या राजकीय वर्तुळात नवा चैतन्य निर्माण केले आहे. आमदार सौ. सुलभाताई खोडके यांच्या हस्ते आवारे यांचा सत्कार करण्यात आला. महिला सक्षमीकरण हा केवळ कागदी विचार न राहता तो प्रत्यक्ष कृतीत उतरवण्यासाठी आपला हा लढा आहे, असा ठाम विश्वास यावेळी आमदार खोडके यांनी व्यक्त केला.
यावेळी व्यासपीठावर महापौर श्रीचंद तेजवानी, उपमहापौर सचिन भेंडे आणि स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. महापालिकेच्या तिजोरीतून महिला व बालकांसाठी राखीव असलेल्या पाच टक्के निधीचा विनियोग करून आरोग्य, पोषण आणि रोजगाराच्या योजना तळागाळातील गरजू महिलांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. ममता आवारे या संवेदनशील कार्यकर्त्या असून त्यांच्या माध्यमातून महिलांच्या प्रश्नांना नक्कीच न्याय मिळेल, अशा भावना मान्यवरांनी व्यक्त केल्या. ’महिला राज’ खर्या अर्थाने यशस्वी करण्यासाठी सर्वांनी एकवटून काम करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. नवनियुक्त सभापती ममता आवारे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, समाजातील शेवटच्या रांगेतील महिलांना स्वावलंबी बनवणे आणि बालकांच्या सुदृढ आरोग्यासाठी काम करणे ही आपली प्राथमिक जबाबदारी आहे. या सोहळ्याला राजकीय, सामाजिक क्षेत्रातील दिग्गज आणि महिला बचत गटांच्या प्रतिनिधींची अलोट गर्दी झाली होती. या दिमाखदार सोहळ्याला पक्षनेते चेतन गावंडे, शहर सुधार समिती सभापती राधा राजू कुरील, विधी समिती उपसभापती मधुरा मिलिंद कहाळे, महिला बाल कल्याण समिती उपसभापती ता देशमुख, नगरसेवक मंगेश मनोहरे, मनीष बजाज, चंद्रकांत उर्फ चंदू खेडकर, गुड्डू उर्फ प्रशांत धर्माळे, प्रमोद महल्ले, भोजराज काळे, अॅड. प्रशांत देशपांडे, नगरसेविका मिनल योगेश सवाई, अर्चना मनीष पाटील, विद्या शिवदत्त माटे, डॉ. अर्चना संजय आत्राम, माजी महापौर अॅड. किशोर शेळके, यश खोडके, मनपा अधिकारी डॉ. प्रकाश मेश्राम, जनसंपर्क अधिकारी भूषण पुसतकर, संदीप मामा आवारे, भास्कर ढेवले, रावसाहेब देशमुख, रश्मी नावंदर, प्रीती येवतकर, रंजना कडू, मनीषा वानखडे, प्रियांका कोराट, कविता गायकवाड, जयश्री आवारे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.




