नव्या शैक्षणिक वर्षाची आनंदी सुरुवात विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण स्वागत
सामाजिक उपक्रमांनी प्रवेशोत्सव साजरा

दर्यापूर /30 जून-अति उष्णतेमुळे लांबणीवर पडलेल्या शाळांची पहिली घंटा मंगळवारी दयार्पणात वाजली आणि शहरासह संपूर्ण तालुक्यात विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने शाळा परिसर पुन्हा एकदा न्हाऊन निघाला. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळांनी फुलांची उधळण करून आणि कपाळावर टिळा लावून स्वागत केले. चिमुकल्यांना चॉकलेट आणि गुलाबपुष्पे देऊन त्यांचे शाळेच्या प्रांगणात मोठ्या थाटामाटात स्वागत करण्यात आले. या पहिल्या दिवशी शाळांमध्ये चैतन्याचे वातावरण होते. शिक्षकांनी केवळ पुस्तकी अभ्यासावर भर न देता मुलांमध्ये शिस्त आणि स्वच्छतेचे संस्कार रुजवण्यावर भर दिला. पर्यावरणाचे रक्षण आणि सामाजिक बांधिलकीचे महत्त्व पटवून देत शिक्षकांनी नव्या वर्षाची सुरुवात एका जबाबदार भूमिकेतून केली. पालकही आपल्या मुलांच्या या पहिल्या दिवसाच्या उत्साहात सहभागी झाले होते. शिक्षण विभागानेही सर्व शाळांना उत्तम शैक्षणिक वातावरण राखण्याचे आवाहन केले असून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. शाळांच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या चेहर्यावरचा आनंद पाहून यंदाचे शैक्षणिक वर्ष गुणवत्तापूर्ण घडणार, याचा विश्वास व्यक्त होत आहे.




