चिमुकल्यांच्या हास्याने फुलले शाळेचे प्रांगण
सीताबाई संगई प्राथमिक शाळेत जल्लोषात प्रवेशोत्सव

अंजनगाव सुर्जी/30 जून : नवीन शैक्षणिक वर्षाची आनंददायी सुरुवात विद्यार्थ्यांच्या हसर्या चेहर्यांनी आणि उत्साहपूर्ण वातावरणात करण्याच्या उद्देशाने अंजनगाव सुर्जी येथील सीताबाई संगई प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. नव्याने शाळेत दाखल झालेल्या चिमुकल्यांचे फुलांनी, टाळ्यांच्या गजरात आणि आपुलकीच्या वातावरणात स्वागत करण्यात आले. त्यामुळे शाळेचा परिसर आनंद, उत्साह आणि नव्या आशांनी भारावून गेला होता.
प्रवेशोत्सवाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. प्रणाली पडोळे यांनी विद्यार्थ्यांचे व पालकांचे मनापासून स्वागत करत शिक्षण हीच मुलांच्या उज्ज्वल भविष्याची खरी गुरुकिल्ली असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी नियमित शाळेत उपस्थित राहून गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा लाभ घ्यावा, तसेच पालकांनीही मुलांच्या शैक्षणिक प्रगतीत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समिती अंजनगाव सुर्जीचे गट समन्वयक श्री. प्रमोद दखने उपस्थित होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात शासनाच्या विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती देत विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास, जिज्ञासा आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या बळावर यशाचे शिखर गाठावे, असे प्रेरणादायी विचार व्यक्त केले. गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा, शिक्षक आणि पालक यांचे परस्पर सहकार्य अत्यंत महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
यावेळी पालक प्रतिनिधी म्हणून उपस्थित असलेले प्रवीण तिखिले आणि सौ. करिश्मा मानकर यांनी शाळेच्या उपक्रमांचे कौतुक करत विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी पालकांनी शाळेशी सातत्याने संपर्क ठेवण्याची आवश्यकता व्यक्त केली. शाळेतील शैक्षणिक वातावरण, विद्यार्थ्यांप्रती शिक्षकांची आत्मीयता आणि विविध उपक्रमांमुळे मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रवेशोत्सवानिमित्त नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांसह आकर्षक भेटवस्तूंचे वितरण करण्यात आले. प्रत्येक विद्यार्थ्याचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले तसेच त्यांच्या शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या स्वागतामुळे चिमुकल्यांमध्ये शाळेविषयी आत्मीयता निर्माण झाली असून अनेक विद्यार्थ्यांच्या चेहर्यावर आनंद ओसंडून वाहताना दिसत होता. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री. तेजल नायडकर यांनी केले. शाळेतील सर्व शिक्षकांनी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना शिक्षणाच्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. संपूर्ण कार्यक्रमात विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात आनंद, प्रेरणा आणि सकारात्मक वातावरणात झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी नवचैतन्य निर्माण झाल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले.




