जिल्ह्यातील 48 अवैध सावकारांवर होणार फौजदारी कारवाई
आ.सुलभा खोडके यांच्या लक्षवेधीची दखल

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती
अमरावती /1 जुलै-राज्यातील विशेषतः अमरावती जिल्ह्यात अवैध सावकारांचा सुळसुळाट वाढला असून शेतकर्यांना उच्च व्याजदराने कर्ज देऊन बळजबरीने वसुली होत आहे. परिणामी, अवैध सावकारी पाशामुळे अनेक शेतकर्यांनी आत्महत्येसारखे पाऊल उचलले आहे. अमरावती जिल्ह्यातील अवैध सावकारीविरुद्ध कठोर कारवाई करणे आवश्यक असून अमरावतीमध्ये अशा किती प्रकर णांची दफ्तरी नोंद आहे व आता पर्यंत किती गुन्हे दाखल कर ण्यात आले, असा प्रश्न आ. सुलभा संजय खोडके यांनी विधानसभेत उपस्थित केला. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये प्रश्नोत्तरांच्या तासात सुलभा खोडके यांनी अमरावती जिल्ह्यातील अवैध सावकारीबाबतचा प्रश्न उपस्थित करून सभागृह दणाणून सोडले. त्यांनी विधिमंडळाला अवगत केले की, अवैध सावकारीची समस्या केवळ अमरावती जिल्ह्यापुरती मर्यादित नसून राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही वाढत आहे. वर्ष 2026 मध्ये सुमारे 2 लाख 34 हजार 149 शेतकर्यांनी सावकारांकडून कर्ज घेतले असून अनेक शेतकर्यांना उच्च व्याजदराने कर्ज वाटप करण्यात आले. सध्या शेतकर्यांना पीक नुकसान व वाढते उत्पादन खर्च अशा समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तर सावकारांकडूनसुद्धा कर्ज भरण्याबाबत तगादा लावला जात असल्याने आधीच अस्मानी व सुलतानी संकटांचा सामना करणार्या शेतकर्यांसमोर नवे संकट उभे ठाकले आहे. अमरावती जिल्ह्यात बँकांकडून होणार्या कर्जपुरवठ्यातील अडचणींमुळे अवैध सावकारीचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला असून संबंधित प्रकरणांमध्ये प्रशासनाकडून प्रभावी कारवाई करण्यास टाळाटाळ होत असल्याचे सांगत आमदार सुलभा खोडकेंनी शासनाचे लक्ष वेधले.
48 सावकारांवर कारवाई-प्रश्नाचे उत्तर देतांना राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितले की, अमरावती जिल्ह्यातील 574 परवानाधारक सावकारांनी एप्रिल 2026 अखेर 43,936 कर्जदारांना 54.63 लाख रुपये इतके बिगर कृषी कर्ज वाटप केलेले आहे. अमरावती जिल्ह्यात अवैध सावकारीच्या एकूण 384 तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी 266 प्रकरणांत तथ्य आढळून आले नाही तर 34 प्रकरणांत तथ्य आढळून आल्याने संबंधितावर म्हणजेच 48 आरोपींवर फौजदारी कारवाई करण्याची घोषणा सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केली.




