शहरातील न्यायाधीश असुरक्षित?

मंत्र्यांच्या घरांवरच दरोडे टाका

* माजी मंत्री बच्चू कडू यांचा सरकारवर थेट निशाणा

अमरावती /15 फेब्रुवारी : शहराला हादरवून सोडणार्‍या न्यायाधीश वसाहतीतील धाडसी चोरीच्या घटनेनंतर प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी सरकारचा अक्षरशः पंचनामा केला आहे. न्याय देणारे न्यायाधीशच जर या राज्यात सुरक्षित नसतील, तर सर्वसामान्यांचे काय? चोरांनी आता न्यायाधीशांच्या घरावर नव्हे, तर थेट मंत्र्यांच्या घरांवरच दरोडे टाकावेत, अशा बोचर्‍या आणि जळजळीत शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
अमरावती येथील अतिसुरक्षित मानल्या जाणार्‍या कांतनगर परिसरात शनिवारी मध्यरात्री पाच न्यायाधीश आणि चार न्यायालयीन कर्मचार्‍यांची घरे फोडून चोरट्यांनी धुमाकूळ घातला. या धक्कादायक प्रकारामुळे पोलीस प्रशासनाच्या अब्रूचे धिंडवडे निघाले असून, बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधला आहे.
अमरावतीमधील ज्या भागात विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकार्‍यांची निवासस्थाने आहेत, त्याच ठिकाणी ही धाडसी चोरी झाली. मुख्य प्रवेशद्वारावर पोलीस बंदोबस्त तैनात असतानाही चोरट्यांनी मागील बाजूच्या झुडपातून शिरून नऊ घरे फोडली. यावर तोफ डागत बच्चू कडू म्हणाले की, तुमचे नाव ’देवाभाऊ’ आहे, पण देवासारखे राज्य येणार कधी? इथे दरोडेखोर उजळ माथ्याने फिरत आहेत आणि तुमची ’वानरसेना’ नेमकी काय करतेय? प्रभू श्रीरामाचे नाव घेता, पण रामराज्याला तुम्ही स्पर्शही केलेला नाही. लाच घेतल्याशिवाय साधे तहसील कार्यालयही चालत नाही, इतकी दुरवस्था या सरकारमध्ये झाली आहे. बच्चू कडू यांनी शेतकरी प्रश्नावरूनही सरकारला धारेवर धरले. हे सरकार परदेशातून सोयाबीन, मका आणि कापूस आयात करून शेतकर्‍यांच्या ताटावर दिवसाढवळ्या दरोडा टाकत आहे. न्यायाधीशाच्या घरची चोरी ही बातमी होते, पण रोज शेतकर्‍यांच्या घरात जो सरकारी दरोडा पडतोय, त्याचे काय? असा जळजळीत सवाल त्यांनी उपस्थित केला. ’बटेंगे तो कटेंगे’च्या वल्गना करणार्‍या सरकारच्या काळात आज हिंदू तर संकटात आहेतच, पण आता न्यायाधीशही ’खतरे मे’ आले आहेत, अशी टीका त्यांनी केली. अमरावतीमधील या घटनेने शहराच्या सुरक्षेचा आणि पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेचा बुरखा फाडला असून, जनतेमध्ये प्रचंड संतापाची लाट आहे.
पोलिसांच्या नाकाखाली धुमाकूळ-ज्या वसाहतीत प्रवेश करताना पोलिसांची परवानगी लागते, तिथे एकाच रात्री नऊ घरांची कुलपे तुटतात, हे पोलीस खात्यासाठी लाजीरवाणे आहे. चोरांनी पोलिसांच्या नाकाखाली हे धाडस केले असून, मंत्र्यांच्या सुरक्षेसाठी धावणारी यंत्रणा न्यायाधीशांनाही सुरक्षा देऊ शकत नसल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button