डफरीन रुग्णालयात दोन नवे अतिदक्षता कक्ष तात्काळ सुरू करा

आगीच्या दुर्घटनेनंतर आ.संजय खोडके व खा.सुलभा खोडके यांची डफरीनला भेट

 सुरक्षेसाठी विशेष तज्ज्ञ नेमा आणि अफवांवर अजिबात विश्वास ठेवू नका

अमरावती /27 ऑगस्ट– जिल्हा स्त्री रुग्णालय डफरीन येथे 24 ऑगस्ट रोजी नवजात बालकांच्या अतिदक्षता कक्षात लागलेल्या भीषण आगीत तीन निष्पाप बालकांचा करुण अंत झाला. या हृदयद्रावक दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसर सुन्न झाला असून रुग्णालयाच्या कारभारावरही त्याचा परिणाम दिसून येत आहे. या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर इतर रुग्णांच्या उपचारात कोणताही खंड पडू नये आणि आरोग्य सेवा सुरळीत राहावी यासाठी आ.सुलभाताई खोडके व विधान परिषद आमदार संजय खोडके यांनी प्रत्यक्ष डफरीन रुग्णालयाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली व कर्मचार्‍यांशी संवाद साधला.
वर्षभरापूर्वी कार्यान्वित झालेल्या नूतन इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावर एकूण तीन अतिदक्षता कक्ष स्थापन करण्यात आले होते. त्यापैकी 10 खाटांचा एक कक्ष जळाल्याने उर्वरित 12 आणि 17 खाटांचे दोन अतिरिक्त कक्ष सर्व अद्ययावत संसाधनांसह तात्काळ सज्ज करण्याचे नियोजन प्रशासनाला देण्यात आले आहे. उपचारासाठी कोणत्याही बाळाला बाहेर पाठवावे लागू नये याची खबरदारी घेण्याचे निर्देश त्यांनी दिले. आगीचे गूढ कायम असले तरी तांत्रिक उणिवा दूर करून फायर ऑडिट, अग्निशमन व्यवस्था आणि आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवत सुरक्षा तज्ज्ञांची नियुक्ती करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. घटनेनंतर रुग्णालयातील सेवा ठप्प झाल्याच्या उठणार्‍या अफवांवर नागरिकांनी अजिबात विश्वास ठेवू नये, असे आवाहन आमदार संजय खोडके यांनी केले. रुग्णालयाची दुरुस्ती, स्वच्छता आणि दर्जेदार कामासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे स्पष्ट करत त्यांनी कर्मचार्‍यांचे मनोबल वाढवले. या पाहणी दरम्यान आरोग्य सेवा उपसंचालक अकोला डॉ. सुशील कुमार वाकचौरे, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनोद पवार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नरोटे, नवजात शिशु तज्ज्ञ डॉ. विजया बोरा, एनआयसीयू प्रभारी डॉ. प्रीती इंगळे, बालरोग तज्ज्ञ डॉ. निलेश पाचबुद्धे, बायो मेडिकल अभियंता अमोल वाडेकर, प्रशासकीय अधिकारी संदीप गोपाळराव तारगे, सार्वजनिक बांधकाम उपअभियंता एन. प्रकाश रेड्डी, विद्युत शाखा उपअभियंता विनोद गहुकर, शाखा अभियंता शंतनू गुल्हाने, मुख्य अग्निशमन अधिकारी दिनेश हंबर्डे व अजय पंधरे यांच्यासह विविध अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Back to top button