अवैध सावकारीविरोधात अमरावती जिल्ह्यात सहा ठिकाणी धाडी

32 संशयास्पद कागदपत्रांसह धनादेश जप्त

11 पथकांकडून तीन दिवसांत धडक कारवाई

अमरावती /21ऑगस्ट – अवैध सावकारी आणि वाढीव व्याजाच्या वसुलीला कंटाळून मोर्शी तालुक्यातील तरोडा डोमक येथील पवन विश्वासराव भाकरे यांनी 25 जुलै रोजी खेड येथील शेतशिवारात आत्महत्या केल्याची तक्रार जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अमरावती यांच्या कार्यालयात प्राप्त झाली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत सहकार विभागाने शुक्रवारी अमरावती शहर, चांदूर बाजार आणि मोर्शी येथे एकाच वेळी 6 ठिकाणी धाडी टाकून झडती घेतली. या कारवाईत 32 संशयास्पद कागदपत्रे, कोरे धनादेश, स्वाक्षरी केलेले कोरे मुद्रांक कागद, मालमत्तेची खरेदीखते, विक्री पावत्या, नोंदवह्या आणि इतर कागदपत्रे मिळून आली असून ती चौकशीसाठी सीलबंद करण्यात आली आहेत. गेल्या 3 दिवसांत सहकार विभागाच्या 11 पथकांनी अमरावती, तिवसा, चांदूर बाजार, मोर्शी आणि नांदगाव खंडेश्वर तालुक्यांत अवैध सावकारीच्या तक्रारींवर कारवाई केली आहे.
जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अमरावती राजेश वि. भुयार यांनी तक्रारीतील मुद्यांची तपासणी करण्यासाठी 6 स्वतंत्र पथके तयार केली. या पथकांनी गाडगेनगर, चांदूर बाजार आणि मोर्शी पोलिस ठाण्याच्या हद्दीत संबंधितांच्या घरांची तसेच प्रतिष्ठानांची झडती घेतली. मोर्शी येथील राधाकृष्ण कॉलनीमधील घनश्याम गट्टाणी यांच्या घराची पथक क्रमांक 1 ने सकाळी 11.15 ते दुपारी 12.35 या वेळेत झडती घेतली. या ठिकाणी अवैध सावकारीशी संबंधित संशयास्पद कागदपत्र आढळले नाही.
अमरावतीतील कठोरा रोडवरील आराधना इमारतीतील देवी निवासस्थानी नवनीत रतनलाल चांडक यांच्या 2 सदनिकांची पथक क्रमांक 2 ने झडती घेतली. सकाळी 10.46 वाजता सुरू झालेली ही कारवाई दुपारी 1.45 वाजता पूर्ण झाली. या ठिकाणी अवैध सावकारीशी संबंधित 32 संशयास्पद कागदपत्रे आढळून आली. त्यात स्वाक्षरी केलेले कोरे मुद्रांक कागद, 1 चे मुद्रांक लावलेले कोरे कागद, धनादेश, विक्री पावत्या, खरेदीखते आणि इतर कागदपत्रांचा समावेश आहे. ही सर्व कागदपत्रे पुढील चौकशीसाठी पथकाने सीलबंद केली.
याच नवनीत रतनलाल चांडक यांच्या कठोरा रोडवरील गौरीनंदन प्रोव्हिजन दुकानाचीही पथक क्रमांक 3 ने झडती घेतली. सकाळी 10.45 ते दुपारी 12.15 या वेळेत झालेल्या कारवाईत नाव नसलेला एक कोरा धनादेश मिळाला. तोही चौकशीसाठी सीलबंद करण्यात आला.
चांदूर बाजार येथील मारवाडीपुरा भागात राजेश चांडक यांच्या राहत्या घराची पथक क्रमांक 4 ने दुपारी 12 ते 2.45 या वेळेत झडती घेतली. मात्र, या ठिकाणी अवैध सावकारीशी संबंधित कोणतेही संशयास्पद कागदपत्र आढळले नाही.जयस्तंभ चौकातील आनंद ट्रेडर्स येथे कमलकिशोर सारडा यांच्या प्रतिष्ठानाची पथक क्रमांक 5 ने सकाळी 11.30 ते दुपारी 1 या वेळेत झडती घेतली. या कारवाईत 9 कोरे मुद्रांक कागद मिळून आले. ते पुढील चौकशीसाठी सीलबंद करण्यात आले.
यानंतर चांदूर बाजार येथील हनुमान चौक परिसरातील कैलास कमलकिशोर सारडा यांच्या घराची पथक क्रमांक 6 ने सकाळी 11.30 ते दुपारी 2.55 या वेळेत झडती घेतली. या ठिकाणी 9 संशयास्पद कागदपत्रे मिळाली. त्यात स्थावर मालमत्तेची खरेदीखते, नोंदवही आणि इतर कागदपत्रांचा समावेश आहे. ही कागदपत्रेही पुढील चौकशीसाठी सीलबंद करण्यात आली. या सर्व कारवाईत सहकार विभागाच्या अधिकार्‍यांसोबत संबंधित पोलिस ठाण्यांतील पोलिस कर्मचारी आणि पंच उपस्थित होते. पथक क्रमांक 1 चे प्रमुख किशोर इंगळे, प्रशांत ढोके, नंदकिशोर दहीकर, जयश्री चंदनकर, पंच रजत पाटील, शैलेश जाणे, मोर्शी पोलिस ठाण्याचे जयकुमार गवळी, अश्विनी बरडे यांनी कारवाई केली. पथक क्रमांक 2 मध्ये प्रमुख स्वाती गुडधे, योगेश जयस्वाल, अमोल लोमटे, महेश डफाळे, पंच ऋषी उंबरकर, नरेंद्र सरोदे, गाडगेनगर पोलिस ठाण्याचे अशोक पटके, कविता शिरसाट सहभागी होते. पथक क्रमांक 3 मध्ये प्रमुख प्रीती धामणे, सुधीर मानकर, प्रमोद कायदे, विजय अंबाडेकर, शिल्पा सातपुते, पंच विजय वाकोडे, आशिष गावंडे, गाडगेनगर पोलिस ठाण्याचे सतीश सावरकर, जया कावळे सहभागी होते.
पथक क्रमांक 4 चे प्रमुख अनिरुद्ध राऊत, राजकुमार गडलिंग, निलेश सपकाळ, नेहा इंगोले, पंच भूषण बोराळे, पंकज वाघमारे, चांदूर बाजार पोलिस ठाण्याच्या पूजा आढे, सैनिक छगन इंगळे यांनी कारवाई केली. पथक क्रमांक 5 चे प्रमुख आशिष चर्जन, अमित नालट, प्रमोद वर्धेकर, प्रेमा नाखले, पंच ओमप्रकाश बोराळकर, मनीष घुलक्षे, चांदूर बाजार पोलिस ठाण्याचे विशाल भोयर, सारिका बांगरे सहभागी होते. पथक क्रमांक 6 चे प्रमुख सचिन पतंगे, विश्वजीत काळे, आशिष भांडे, उज्ज्वला मोहोड, पंच महेश इंगळे, सुनील डांगे, चांदूर बाजार पोलिस ठाण्याच्या शालिनी वर्‍हाडे, सैनिक अमोल मनोहरे यांनी कारवाई केली.
महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियम 2014 मधील तरतुदीनुसार जप्त करण्यात आलेल्या सर्व कागदपत्रांची तपासणी केली जाणार आहे. विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था अमरावती गौतम वर्धन आणि जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अमरावती राजेश वि. भुयार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निबंधक सहकारी संस्था मोर्शी स्वाती गुडधे या कागदपत्रांची पडताळणी करणार आहेत. या तपासणीत कागदपत्रांचा वापर नेमका कशासाठी झाला, त्यातून सावकारीचे व्यवहार झाले का आणि तक्रारीतील आरोपांमध्ये तथ्य किती आहे, याचा शोध घेतला जाणार आहे.गेल्या 3 दिवसांत अमरावती सहकार विभागाने अवैध सावकारीच्या तक्रारींवर केलेल्या कारवाईमुळे जिल्ह्यातील खासगी सावकारीच्या व्यवहारांकडे पुन्हा लक्ष गेले आहे. विशेषतः कोरे मुद्रांक कागद, धनादेश आणि मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे मिळाल्याने या प्रकरणाच्या पुढील चौकशीकडे आता लक्ष लागले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button