नो एन्ट्री’ लावून चालणार नाही, सार्वजनिक माल वाहतूक सुरळीत करण्यासाठी उपाययोजना करा
आ.सुलभा खोडके व आ.संजय खोडके यांचे निर्देश

अमरावती/21 ऑगस्ट– अमरावती शहरात वाढत्या अपघातांवर वेसण घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने जारी केलेल्या कठोर ’नो-एंट्री’ आदेशामुळे संपूर्ण व्यापार्यांचे कंबरडे मोडले असून शहराचे अर्थचक्र पुरते ठप्प झाले आहे. या पार्श्वभूमीवर आ.सुलभाताई खोडके आणि आमदार संजय खोडके यांच्या पुढाकाराने पोलीस आयुक्त कार्यालयात एक महत्त्वाची बैठक पार पडली. केवळ प्रवेशबंदी लादून भागणार नाही, तर नियमांत शिथिलता देऊन वाहतूक सुरळीत करा, असा रोखठोक इशारा लोकप्रतिनिधींनी दिला. यावर सकारात्मक पाऊल उचलत पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी स्वतः रस्त्यावर उतरून ’ऑन-स्पॉट’ पाहणी करून नियमांत आवश्यक बदल करण्याचे आश्वासन दिले आहे.
शहर परिसरात अवजड वाहनांमुळे होणार्या दुर्घटना टाळण्यासाठी 2 टनांपेक्षा जास्त क्षमतेच्या वाहनांना सकाळी 6:30 ते रात्री 9:30 पर्यंत शहरात प्रवेशबंदी घालण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवांच्या वाहनांना सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेतच सवलत दिली आहे. मात्र या कडक निर्बंधांमुळे बाजारपेठांमधील मालवाहतूक खोळंबली असून धान्य, किराणा आणि बांधकाम क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. बैठकीत लोकप्रतिनिधींनी स्पष्ट केले की, हॉटेल्स गौरी इन ते बडनेरा, जुना बायपास, राजुरा नाका, नागपुरी गेट, ट्रान्सपोर्ट नगर, पंचवटी, शेगाव नाका, कठोरा, एमआयडीसी कॉरिडॉर, दस्तूर नगर आणि छत्रीतलाव परिसर हे शहराच्या व्यापाराची मुख्य धमन्या आहेत. ’नो-एंट्री’ची वेळ संपताच एकदम सर्व वाहने रस्त्यावर आल्यास अपघातांचा धोका अधिक वाढू शकतो. त्यामुळे मुख्य मार्गांवर वेळ व नियमांची योग्य पुनर्रचना करणे गरजेचे आहे. या बैठकीला आमदार सौ. सुलभाताई खोडके, विधान परिषद आमदार संजय खोडके, पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त यशवंत सोळंखे, श्याम घुगे, प्रांजली सोनवणे, साहाय्यक पोलीस आयुक्त संजय खताळे, वाहतूक निरीक्षक वैभव पानसरे यांच्यासह अख़्तर हुसैन, संजय काकरणीया, अशोक अग्रवाल, गोविंद सोमाणी, सुरेश जैन, मेराज खान पठाण, वसीम खान तसेच अमरावतीचे सर्व व्यापारी व ट्रान्सपोर्ट संघटनांचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.




