महावितरणच्या कर्मचार्यांनी दैनंदिन कामकाजात सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे
संचालक राजेंद्र पवार यांचे प्रतिपादन

अमरावती/21 ऑगस्ट: विद्युत अपघातामुळे कमावत्या व्यक्तिचा प्राणांतिक अपघात झाल्यास त्याच्या कुटुंबातील तीन पिढ्यांचे मोठे नुकसान होते. त्यामुळे महावितरणच्या तांत्रिक कर्मचार्यांनी दैनंदिन कामकाज करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे आणि कोणत्याही परिस्थितीत विद्युत अपघात होणार नाही याची दक्षता घ्यावी, तसेच शुन्य विद्युत अपघाताचे ध्येय कायम समोर ठेवावे असे आवाहन महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांनी केले आहे.
विद्युत भवन अमरावती येथे आज (दि.21 ऑगष्ट) जिल्ह्यातील जनमित्रांना प्रातिनिधिक स्वरूपात सुरक्षा साहित्याचे वाटप संचालक पवार यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. सांघिक कार्यालयाने केंद्रीय स्तरावर खरेदी करून सर्व तांत्रिक कर्मचार्यांना दर्जेदार सुरक्षा साहित्य पुरवले आहे. त्याचा उपयोग करून ग्राहकांना अखंडित व दर्जेदार वीज पुरवठ्यासाठी कटिबद्ध राहण्याची सूचनाही त्यांनी केली. यावेळी मुख्य अभियंता दिलीप दोडके (अमरावती), दत्तात्रय बनसोडे (अकोला), अधीक्षक अभियंता दिपक देवहाते व राजेश घाटोळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी संचालक पवार यांनी मानव संसाधन विभागाची सविस्तर आढावा बैठक घेतली. व्यवस्थापनाच्या विविध कल्याणकारी योजना प्रत्येक कर्मचार्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तत्परतेने काम करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले. तसेच कर्मचार्यांचे सर्व प्रलंबित दावे, पदोन्नती पॅनल्स आणि शिस्तभंग कारवाईशी संबंधित प्रकरणांचा निर्धारित वेळेत वेगाने निपटारा करण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या. महावितरणच्या तांत्रिक कर्मचार्यांना वीज सेवेशी निगडीत काम करतांना त्यांचे मनोधैर्य उंच राखण्याकरीता आणि कर्मचार्यांच्या सर्व समस्या निकाली काढून सुविधांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहचविण्याकरीता अमरावती परिमंडळ मानव संसाधन विभामार्फत उपलब्ध करून दिलेल्या विशेष व्हॉट्स एप सेवेचा शुभारंभ संचालक पवार यांच्या हस्ते यावेळी करण्यात आला. डॉ.संतोष पाटणी यांनी कार्यक्रमा भूमिका मांडली. रामगोपाल अहिर, अभियंता प्रदिप अंधारे, विजयकुमार कासट, संजय शृंगारे, रविंद्र वांदिले, प्रशांत लहाने, निशिकांत राऊत, व्यवस्थापक कल्पना भुले यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.




