अमरावतीत साकारतेय भव्य बालकृष्ण धाम
रुक्मिणी रथ मंदिरातून विदर्भाला मिळणार नवी ओळख

अमरावती/21 ऑगस्ट- अमरावती आणि विदर्भातील भाविकांच्या प्रतीक्षेतील इस्कॉन अमरावतीच्या ‘बालकृष्ण धाम’ प्रकल्पाला आता मोठी चालना मिळाली आहे. रेवसा परिसरातील मालू सिटी येथे उभारण्यात येणार्या या भव्य धार्मिक आणि सांस्कृतिक प्रकल्पासाठी 20 ऑगस्ट रोजी भूमीची कायदेशीर नोंदणी पूर्ण झाली. सुमारे अडीच एकर जागेवर 50 कोटी रुपयांच्या खर्चातून हा प्रकल्प उभारला जाणार असून त्यात 108 फूट उंच श्रीकृष्ण रुक्मिणी रथ मंदिर उभारले जाणार आहे.
या प्रकल्पाचे भूमिपूजन 8 मे 2025 रोजी धार्मिक कार्यक्रमातून झाले होते. आता नोंदणी पूर्ण झाल्यामुळे प्रकल्पाला प्रशासकीय आणि कायदेशीर बळ मिळाले आहे. नोंदणी प्रक्रियेत इस्कॉन अमरावतीचे क्षेत्रीय सचिव सहाय्यक अनंतशेष प्रभू यांनी स्वाक्षरी केली. मंदिराध्यक्ष अद्वैत आचार्य प्रभू यांच्यासह भाविक आणि पदाधिकारी उपस्थित होते. या भव्य मंदिराची संकल्पना इस्कॉनचे आजीवन सदस्य स्वर्गीय प्रवीण मालू यांच्या स्वप्नातून पुढे आली. अमरावतीत श्रीकृष्ण धाम उभारून आध्यात्मिकता, भारतीय संस्कृती आणि संस्कारांचा प्रसार करण्याची त्यांची इच्छा होती. त्यांच्या निधनानंतर कुटुंबीयांनी हा संकल्प पुढे नेला. वरुण मालू, प्रज्ज्वल मालू, पूर्वा मालू, प्रिया मालू आणि सूरज तलडे प्रकल्पासाठी महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत. मालू कुटुंबीयांनी भूमीदानासोबत मंदिर उभारणीतही सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. परिसरात संस्कार भवन, अन्नक्षेत्र, प्रसाद केंद्र, अतिथी निवास, गोविंदा भोजनालय, गुरुकुल, गोशाळा, आश्रम आणि आध्यात्मिक व सांस्कृतिक शिक्षण केंद्र उभारले जाणार आहे. मुलांसाठी संस्कार व क्रीडा परिसरही राहणार आहे. हरिनाम संकीर्तन, भगवद्गीता आणि श्रीमद्भागवत अध्ययन, युवक प्रशिक्षण व बालसंस्कार शिबिरे नियमित घेतली जाणार आहेत. पावसाळा संपल्यानंतर मुख्य मंदिरासह संपूर्ण परिसराच्या बांधकामाला वेग देण्यात येणार आहे. परम पूज्य लोकनाथ स्वामी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित होणारा हा प्रकल्प अमरावतीसह संपूर्ण विदर्भासाठी महत्त्वाचे धार्मिक आणि सांस्कृतिक केंद्र ठरण्याची अपेक्षा आहे.




