अमरावतीच्या उमरडा गायीसह माडग्याळ मेंढीला राष्ट्रीय मान्यता

विदर्भातील उमरडा गायीच्या संवर्धनाला मिळणार नवे बळ

माडग्याळ मेंढीच्या सुधारित पैदाशीसाठी निधीचा मार्ग मोकळा

अमरावती/21 ऑगस्ट – अमरावतीची ओळख असलेल्या उमरडा गायीला स्वतंत्र देशी गोवंश म्हणून, तर सांगलीच्या माडग्याळ मेंढीला स्वतंत्र अधिकृत जात म्हणून राष्ट्रीय मान्यता मिळाली आहे. भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या जात नोंदणी समितीच्या 14 व्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. या मान्यतेमुळे दोन्ही जातींचे जतन, संवर्धन आणि सुधारित पैदास करण्यासाठी शासनाकडून विशेष योजना आणि निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पशुपालकांच्या दृष्टीने हा निर्णय मोठा दिलासा मानला जात आहे.
राज्याच्या पशुसंवर्धन विभागाने हरियाणातील कर्नाल येथील राष्ट्रीय पशु आनुवंशिक संसाधन ब्युरोकडे उमरडा गाय आणि माडग्याळ मेंढीला राष्ट्रीय मान्यता देण्याचा प्रस्ताव पाठविला होता. त्याला समितीने मंजुरी दिली. पशुसंवर्धन विभागाचे सचिव डॉ. रामास्वामी एन. यांनी या निर्णयामुळे दोन्ही स्थानिक जातींच्या संवर्धनाला मोठी मदत होणार असल्याचे सांगितले.
पुण्याचे पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. शीतल कुमार मुकणे यांनी या प्रक्रियेत बकरी व मेंढी विकास महामंडळ, नागपूरचे महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ तसेच कर्नाटकातील कृषी आणि पशुवैद्यकीय विद्यापीठांतील तज्ज्ञांचे महत्त्वाचे योगदान असल्याचे स्पष्ट केले.अमरावती, यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यांत उमरडा गाय मोठ्या प्रमाणात आढळते. उंच बांधा आणि पांढरा रंग ही तिची प्रमुख ओळख आहे. ब्रिटिशकालीन 1910च्या गॅझेटमध्येही या गोवंशाचा उल्लेख आढळतो. यवतमाळमधील दिग्रस, दारव्हा, आर्णी, वाशिममधील मानोरा, मंगरुळपीर, कारंजा लाड आणि अमरावतीतील नांदगाव खंडेश्वर परिसरात ती आढळते. बंजारा समाजाकडून या गायीचे पारंपरिक पद्धतीने संगोपन केले जाते.
सांगली जिल्ह्यात सुमारे 100 वर्षांपूर्वी विकसित झालेली माडग्याळ मेंढी मोठ्या आकारमानासाठी आणि मांसासाठी प्रसिद्ध आहे. यापूर्वी महाराष्ट्रातील दख्खनी मेंढीला राष्ट्रीय मान्यता मिळाली होती. राष्ट्रीय मान्यतेमुळे या जातींचा दर पाच वर्षांनी होणार्‍या पशुगणनेत समावेश होणार आहे. या निर्णयाचा पशुपालकांचे उत्पन्न वाढविण्यासाठी भविष्यात मोठा फायदा होईल, असा विश्वास पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला

संबंधित बातम्या

Back to top button