लुंबिनी बुद्ध विहारात अष्टांगिक मार्ग साधना

बुद्ध जयंतीनिमित्त धम्म उपक्रम उत्साहात

* लोकप्रतिनिधी आणि मान्यवरांची उपस्थिती लाभ

अकोला/16 एप्रिल- येथील लुंबिनी बुद्ध विहारामध्ये तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंती महोत्सवाचे औचित्य साधून भव्य अष्टांगिक मार्ग ध्यान समाधी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. पी.एस. खडसे आणि श्रमण संघाच्या पुढाकाराने 14 एप्रिलपासून या विशेष धम्म साधनेला प्रारंभ झाला असून, 1 मे रोजी बुद्ध जयंतीच्या दिवशी या उपक्रमाची सांगता होणार आहे. पूज्य भदंत बुद्धघोष, भदंत अमोल बोधी आणि भदंत चंद्रमणी यांच्या पावन मार्गदर्शनाखाली हा ध्यान समाधी मास पाळला जात आहे. यामध्ये डॉ. पी.एस. खडसे, राज्यवर्धन बागडे आणि विनोद मनोहर हे उपासक पूर्ण वेळ सहभागी होऊन साधना करीत आहेत. या महोत्सवाचा मुख्य सोहळा 1 मे रोजी संपन्न होणार असून, त्याबाबतची सविस्तर माहिती डॉ. खडसे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. या मुख्य सोहळ्याचे अध्यक्षपद दिलीप एडतकर भूषविणार असून, प्रमुख अतिथी म्हणून आ. राजेश वानखडे आणि आ. गजानन लवटे यांची उपस्थिती लाभणार आहे. या मंगलमयी सोहळ्याला किशोर बोरकर, गोपीचंद मेश्राम, डॉ. कमल राऊत, राजेश रामटेके, प्रभाकर घोडेस्वार, दादासाहेब क्षीरसागर, मेजर महादेव खंडारे, रोहनखेडा येथील सरपंच विना भिलकर, हरिदास शिरसाठ, देवेंद्र खडसे आणि कारंजा येथील दिलीप भोजराज प्रामुख्याने उपस्थित राहतील. या विशेष कार्यक्रमात गायक कलाकार संघातर्फे स्वागत गीत आणि धम्म गीते सादर केली जाणार असून, सहभागी मान्यवरांचा गौरव म्हणून त्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात येईल. लुंबिनी बुद्ध विहार परिसरातील या आध्यात्मिक वातावरणामुळे जनमानसात उत्साहाचे वातावरण असून, सर्व सामान्य नागरिकांनी या धम्म सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
साधनेतून मानवी कल्याणाचा मार्ग प्रशस्त-भगवान बुद्धांनी सांगितलेला अष्टांगिक मार्ग हा दु:ख मुक्तीचा खरा मार्ग आहे. 14 एप्रिलपासून सुरू झालेली ही ध्यान साधना 1 मे पर्यंत अखंडपणे चालणार असून, या माध्यमातून मनाची शांती आणि सामाजिक सलोखा जपण्याचा प्रयत्न श्रमण संघाच्या वतीने केला जात आहे.

संबंधित बातम्या

Back to top button