प्रतिबंधित नायलॉन मांजा जप्त, एकास अटक

3.48 लाखांचा एवज जप्त

अकोला /16 नोव्हेंबर – सिव्हील लाईन पोलीस स्टेशन हद्दीत 15 नोव्हेंबर रोजी शहर वाहतूक पोलीस चे पथक पेट्रोलिंग करीत असताना शहर वाहतूक पोलीस निरीक्षक विलास पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनच्या हद्दीत रामलता बिजनेस सेंटर समोरील तिरुपती बजाज मोटर शोरूम समोर प्रतिबंधित चाइनीज नायलॉन पतंग मांजाची विक्री करण्यासाठी ट्रॅव्हल्स मधून आणण्यात आला असून तो रस्त्याच्या कडेला ठेवण्यात आला आहे. या माहितीची स्टेशन डायरीत नोंद करून पोलिसांनी पोलीस कर्मचारी व दोन पंचासह घटनास्थळी छापा टाकला असता रस्त्याच्या कडेला प्लास्टिकच्या गोण्या ठेवलेल्या आढळल्या. तेथे उभ्या असलेल्या इसमाने स्वतःचे नाव करण राम चंदन वय 36 वर्षे, रा.हनुमान बस्ती, रामदास पेठ, अकोला असे सांगितले. पंचासमक्ष गोण्यांची झडती घेतली असता त्यामध्ये प्रतिबंधित नायलॉन मांजाच्या रील आढळून आल्या. सदर कारवाईत मोना फायटर कंपनीचे 190 नग व हिरो पल्स कंपनीचे 60 नग नायलॉन मांजाची रील्स जप्त करण्यात आली. सदर रिल्स ची किंमत 3 लाख 48 हजार रुपये व एक गॅलेक्सी मोबाईल किंमत 10 हजार रुपये असा एकूण 3 लाख 58 हजार रुपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चायनीज नायलॉन मांजामुळे पशुपक्षी तसेच नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण होत असतानाही आरोपीने विक्रीसाठी तो बाळगल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे आरोपी विरुद्ध कलम 292,125 भा. न्या. संहिता सह कलम 5,15 पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. पोलीस प्रशासनातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की प्रतिबंधित नायलॉन किंवा चायनीज मांजाची विक्री साठवणूक व वापर करू नये, अशा मांजाची विक्री करताना कोणी आढळल्यास त्वरित जवळच्या पोलीस स्टेशनला किंवा डायल 112 वर माहिती द्यावी. माहिती देणार्‍याचे नाव गोपनीय ठेवले जाईल.

Back to top button