दिव्यांगाच्या किट्स खरेदी करून आर्थिक मदत
भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी महाविद्यालय

अकोला/16 नोव्हेंबर – दिव्यांग सोशल फाऊंडेशन, अकोला यांच्या वतीने आयोजित एक हात सहकार्याचा या उपक्रमानिमित्त भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी महाविद्यालय, मलकापूर (जि. अकोला) कडून दिव्यांग बांधवांना आगळ्या-वेगळ्या पद्धतीने आर्थिक मदत देण्यात आली.
महाविद्यालयाने दिव्यांग बांधवांनी स्वतःच्या हाताने तयार केलेल्या किट्स विकत घेऊन त्यांना आर्थिक मदत केली. केवळ मदत न देता, त्यांच्या कष्टाला, कौशल्याला आणि स्वावलंबनाला मान दिला. यातून दिव्यांगांना केवळ पैसा नाही, तर आत्मसन्मान आणि प्रोत्साहनही मिळाले. या किट्स खरेदीसाठी लागणारा निधी महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचार्यांनी रद्दी संकलनातून उभारला होता. दिवाळीच्या साफसफाईत निघणारी रद्दी, जुने पेपर, पुस्तके, पुठ्ठे यांचे संकलन करून त्यातून मिळालेल्या रकमेतून या किट्स खरेदी करण्यात आल्या. ही मदत संस्था अध्यक्ष प्रा. सचिन दशरथ भांडे आणि महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. गोपाल कळसकर यांच्या हस्ते दिव्यांग सोशल फाऊंडेशन, अकोला यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे प्राध्यापक, विद्यार्थी व फाऊंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते. मदत नाही, तर सहकार्य – दिव्यांगांच्या हाताला काम देऊन त्यांना स्वावलंबी बनवणे हाच खरा सहकार्याचा हात आहे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. रद्दीतून सेवा आणि दिव्यांगांच्या किट्समधून स्वावलंबन, असा दुहेरी संदेश या उपक्रमातून देण्यात आला. या स्तुत्य उपक्रमाबद्दल महाविद्यालयाचे परिसरातून सर्वत्र कौतुक होत आहे.





