सायंकाळ होताच निर्जनस्थळी आता पोलिसांचा खडा पहारा
भानखेडा सामूहिक अत्याचार प्रकरणानंतर प्रशासनाचे

दामिनी पथकासह बीट मार्शलची रात्रभर गस्त
अमरावती /6 एप्रिल: भानखेडा शिवारात एका तरुणीवर झालेल्या अमानवीय सामूहिक अत्याचारानंतर संपूर्ण अमरावती जिल्हा हादरला असून नागरिकांमध्ये संतापाची तीव्र लाट उसळली आहे. या काळजाचा थरकाप उडवणार्या घटनेनंतर पोलीस प्रशासनाला जाग आली असून, महिलांच्या सुरक्षेसाठी आता शहराच्या कानाकोपर्यात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विशेषतः सायंकाळच्या वेळी शहराबाहेरील निर्जनस्थळी आणि सुनसान रस्त्यांवर पोलिसांनी आपला पहारा वाढवला असून, गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी ’दामिनी पथक’ आणि ’बीट मार्शल’ आता रात्रभर गस्त घालताना दिसणार आहेत. भानखेडा येथील घटना अत्यंत क्रूर आणि माणुसकीला काळिमा फासणारी ठरली. लांब सहलीसाठी गेलेल्या एका तरुण-तरुणीला पाच नराधमांनी घेरले, तरुणाला बेदम मारहाण करून त्याचे हात-पाय बांधले आणि तरुणीवर अत्याचार केला. इतकेच नव्हे, तर या नराधमांपैकी एकाने या घृणास्पद कृत्याचे भ्रमणध्वनीवर चित्रीकरण करून तरुणीला धमकावण्याचा प्रयत्न केला. ही घटना समोर येताच शहरात खळबळ उडाली असून, विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांच्या पदाधिकार्यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन आरोपींना थेट फाशीची शिक्षा देण्याची मागणी लावून धरली आहे.विगत तीन महिन्यांची आकडेवारी पाहिली तर अमरावती शहरात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ झाली आहे. गेल्या 90 दिवसांत जबरदस्तीचे 15 आणि विनयभंगाचे 49 गुन्हे नोंदवले गेले आहेत. महिला अत्याचाराची एकूण 64 प्रकरणे समोर आल्यामुळे शहराच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी कडक पावले उचलली आहेत. आता सायंकाळच्या सुमारास फिरण्यासाठी बाहेर पडणार्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी शहरातील बाहेरील भाग, टेकड्या आणि निर्जन स्थळांवर पोलिसांचे विशेष पथक तैनात राहील. शहराच्या सीमेवर असलेल्या टेकड्या आणि निर्जन जागांवर अनेक तरुण-तरुणी वेळ घालवण्यासाठी जातात. अशा ठिकाणी गुन्हेगारांचा वावर वाढण्याची भीती असते. हे लक्षात घेऊन आता संबंधित पोलीस ठाण्यांमधील बीट मार्शलसह महिला पोलिसांचे दामिनी पथक सायंकाळपासून ते मध्यरात्रीपर्यंत या भागांत सतत गस्त घालणार आहे. संशयास्पद हालचाली करणार्यांची कसून चौकशी केली जाईल आणि विनाकारण फिरणार्यांना समज दिली जाईल. भानखेडा सारख्या दुर्दैवी घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आणि महिलांना निर्भयपणे वावरता यावे, यासाठी पोलीस यंत्रणा आता पूर्ण ताकदीनिशी रस्त्यावर उतरली आहे. सामान्य नागरिकांनीही अशा निर्जनस्थळी जाणे टाळावे आणि संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
नराधमांना फाशीची शिक्षा द्या!-भानखेडा सामूहिक अत्याचार प्रकरणातील पाचही नराधमांना पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याविरोधात संपूर्ण जिल्ह्यात तीव्र रोष आहे. माणुसकीला काळिमा फासणार्या या गुन्हेगारांना कठोरात कठोर म्हणजे फाशीचीच शिक्षा व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे. समाजात दहशत पसरवणार्या अशा विकृत प्रवृत्तींचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांनी आपला विळखा आता अधिक घट्ट केला आहे.




