100 कोटींतून उभी राहणार मनपाची बहुमजली इमारत

वर्षानुवर्षांची मागणी अखेर पूर्णतेच्या दिशेने

-राणा-खोडकेंच्या प्रयत्नांनंतर प्रस्तावाला गती
-सल्लागार संस्था निवडण्याची प्रक्रिया सुरु
अमरावती / 1 ऑगस्ट : अमरावती शहराच्या प्रशासनाला आधुनिक रूप देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले असून, येत्या काळात जुन्या आणि जीर्ण झालेल्या महापालिका इमारतीच्या जागीच सुसज्ज, बहुमजली नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम करण्यात येणार आहे. या प्रकल्पावर सुमारे 100 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. सध्या मनपाने प्रकल्प सल्लागार संस्था निवडण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
सध्याची मनपाची इमारत ही शहराच्या मध्यवर्ती भागात असूनही, तिची अवस्था अत्यंत जर्जर झाली आहे. अनेक विभाग स्वतंत्र इमारतींमध्ये विखुरले गेले आहेत. परिणामी नागरिकांना आवश्यक सेवा घेण्यासाठी अनेक ठिकाणी चकरा माराव्या लागतात. ही अडचण लक्षात घेता, आमदार सुलभा खोडके यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत नव्या प्रशासकीय इमारतीची मागणी लावून धरली होती. त्याला आमदार रवि राणा यांचाही पाठिंबा लाभला आणि प्रकल्पाला गती मिळाली. या भव्य प्रकल्पाच्या रचना, देखरेख आणि अंमलबजावणीसाठी सल्लागार संस्था नेमली जाणार आहे. या संदर्भात महापालिकेने निविदा प्रक्रिया सुरू केली असून सात कंपन्यांनी उमेदवारी दाखल केली आहे. या कंपन्यांचे प्रस्तुतिकरण 7 किंवा 8 ऑगस्ट रोजी होणार आहेम पीएमसीच्या माध्यमातून संपूर्ण प्रकल्पाचा डिझाईन, आराखडा आणि देखरेख केली जाईल.
प्रशासकीय इमारतीच्या तळमजल्यावर सध्या व्यापार्‍यांचे संकुल आहे. या दुकानदारांचे किराया पट्टे वर्षभरापूर्वीच संपले असून, नवीन इमारतीमध्ये त्यांचा समावेश होणार की विस्थापन, याबाबत प्रशासनात संभ्रमाचे वातावरण आहे. व्यापार संकुलामुळे कामात अडथळा येण्याची शक्यता लक्षात घेता, प्रशासन त्यांना इतरत्र हलवण्याच्या विचारात आहे. इमारतीचे बांधकाम सुरू झाल्यावर सध्या कार्यरत असलेले प्रशासकीय कार्यालय व विविध विभागांना तात्पुरते स्थलांतर करावे लागणार आहे. यासाठी नेहरू मैदान शाळा, राजापेठ व्यापारी संकुल, तसेच तहसील कार्यालयाची जुनी इमारत हे पर्यायी स्थळ म्हणून विचाराधीन आहेत. तथापि, तहसील कार्यालयाची जागा वापरल्यास मनपाला त्यासाठी भाडे द्यावे लागेल.
नवीन इमारतीत संपूर्ण 5 झोन कार्यालये, विविध प्रशासकीय विभाग, पार्किंग सुविधा, डिजिटल सेवा केंद्रे यांचा समावेश असेल. सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्याने नागरिकांची मोठी गैरसोय दूर होणार आहे. या इमारतीमुळे महापालिकेचे प्रशासन अधिक सुसंगत, कार्यक्षम आणि पारदर्शक होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. अमरावती शहराच्या शहरी विकासात ही इमारत एक मैलाचा दगड ठरेल, असे मत महापालिकेतील अधिकार्‍यांनी व्यक्त केले आहे. यासाठी नागरिकांच्या सहकार्याची आणि सूचना देण्याची भूमिका देखील महत्त्वाची ठरणार आहे.
येत्या काळात कार्यालयांचे तात्पुरते स्थलांतर होणार असल्याने, नागरिकांनी मनपाच्या अधिकृत सूचनांकडे लक्ष द्यावे, व सेवांमध्ये होणार्‍या बदलांची पूर्वकल्पना घेऊन आपली कामे नियोजनबद्ध करावीत.
-सध्याच्या जागेवरच उभारणी
सद्यस्थितीत महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीसाठी 6,706 चौ. फूट जागा उपलब्ध आहे. सुरुवातीला महापौर बंगला व कृषी विद्यापीठाची जागा यांचा विचार झाला होता. मात्र त्या जागा अपुर्‍या असल्याने अखेर सध्याच्या जागेवरच नव्या इमारतीची उभारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Back to top button