कुमकुम मोहोडची राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णभरारी

तीन पदकांसह रौप्यपदकाचीही कमाई

* महाराष्ट्राच्या तिरंदाजांचा राष्ट्रीय स्पर्धेत दबदबा

अमरावती /18 नोव्हेंबर- अमरावतीच्या 17 वर्षीय तिरंदाज कुमकुम मोहोड हिने शिलाँग येथे झालेल्या वरिष्ठ राष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धेत 3 सुवर्ण आणि 1 रौप्यपदक पटकावत राज्यासह अमरावतीचे नाव देशभर गाजवले. पात्रता फेरी, मिश्र संघ आणि महिला संघ अशा तीन प्रकारांत सुवर्णपदक मिळवणार्‍या कुमकुमला वैयक्तिक अंतिम फेरीत मात्र थोड्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला. दुसरीकडे महाराष्ट्राच्या पुरुष संघानेही सुवर्णपदक मिळवले. त्यामुळे या स्पर्धेत महाराष्ट्राच्या तिरंदाजांनी आपला दबदबा कायम ठेवला.
पात्रता फेरीत सुवर्णपदक जिंकणार्‍या कुमकुमने पार्थ साळुंके याच्यासोबत मिश्र संघाच्या अंतिम सामन्यात रेल्वे क्रीडा प्रोत्साहन मंडळाच्या संघाचा 6-2 असा पराभव केला. पहिला संच जिंकल्यानंतर रेल्वेने बरोबरी साधली; मात्र पुढील दोन्ही संच जिंकत महाराष्ट्राने सुवर्णपदकावर नाव कोरले. महिला संघाच्या अंतिम सामन्यात कुमकुम मोहोड, गाथा खडके आणि श्वरी शेंडे यांनी हरियाणाविरुद्ध सुरुवातीचे दोन संच गमावल्यानंतर जोरदार पुनरागमन केले. सामना 4-4 असा बरोबरीत आणत निर्णायक फेरीत 27-25 असा विजय मिळवला. वैयक्तिक अंतिम फेरीत कुमकुमला अनुभवी अंकिता भगत हिच्याविरुद्ध 6-4 असा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे तिला रौप्यपदक मिळाले. पुरुषांच्या वैयक्तिक अंतिम फेरीत दिल्लीच्या ध्रुव बग्गा याने ऑलिंपिकपटू धीरज बोम्मादेवरा याला 10-9 असे हरवले. कुमकुमचे प्रशिक्षक प्रफुल्ल डांगे यांनी तिच्या कामगिरीचे कौतुक केले. वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेतील महाराष्ट्राच्या तिरंदाजाची ही सर्वोत्तम कामगिरी असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र तिरंदाजी संघटनेचे अध्यक्ष प्रशांत देशपांडे, सचिव प्रमोद चांदूरकर, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव आणि उपसंचालक अविनाश पुंड यांच्या सहकार्याबद्दल त्यांनी आभार मानले.

महाराष्ट्राच्या पदकांची दमदार कमाई

शिलाँग येथील स्पर्धेत महाराष्ट्राच्या रिकर्व्ह संघाने एकूण 4 सुवर्ण, 1 रौप्य आणि 1 कांस्यपदक मिळवले. यात कुमकुम मोहोडचा वाटा 3 सुवर्ण आणि 1 रौप्यपदकांचा राहिला. पुरुष संघालाही सुवर्णपदक मिळाले. आशियाई स्पर्धेतील दोन सुवर्णपदकांनंतर वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेतील या कामगिरीने कुमकुमने भारतीय तिरंदाजी क्षेत्रातील आपली गुणवत्ता पुन्हा सिद्ध केली. अमरावतीसाठी ही अभिमानाची बाब ठरली.

Back to top button