धामणगाव रेल्वेत पुतळा जाळत निषेध
सोनिया गांधींच्या पुस्तकाची पाने फाडल्याने काँग्रेस आक्रमक

महायुती सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा
शिंदे सेनेच्या विरोधात राजकीय भडका
धामणगाव रेल्वे/18 नोव्हेंबर – सोनिया गांधी यांच्या आत्मचरित्राची पाने फाडल्याच्या निषेधार्थ अमरावती जिल्हा युवक काँग्रेसने धामणगाव रेल्वेत आक्रमक पवित्रा घेत शिंदे सेना आणि महायुती सरकारचा प्रतीकात्मक पुतळा जाळला. यावेळी झालेल्या जोरदार घोषणाबाजीमुळे शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून या आंदोलनात खा. बळवंत वानखडे, माजी मंत्री यशोमती ठाकूर आणि माजी मंत्री सुनील देशमुख यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.सोनिया गांधी यांच्या ’आपलेपण’ या आत्मचरित्राचा अवमान करणार्या शिंदे सेनेच्या नेत्यांविरोधात अमरावती जिल्हा युवक काँग्रेसने आक्रमक आंदोलन केले. धामणगाव रेल्वे येथे महायुती सरकार व शिंदे सेनेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. या आंदोलनामुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता.सोनिया गांधी यांच्या आत्मचरित्राच्या पुस्तकाची विटंबना केल्याची घटना समोर आल्यानंतर अमरावती जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली. या घटनेचा निषेध करण्यासाठी युवक काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते धामणगाव रेल्वे येथील चौकात मोठ्या संख्येने जमा झाले होते. आंदोलकांनी शिंदे सेना आणि महायुती सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा देत परिसर दणाणून सोडला. संतप्त कार्यकर्त्यांनी यावेळी सत्ताधार्यांचा प्रतीकात्मक पुतळा पेटवून देत आपला रोष व्यक्त केला. या आंदोलनाला जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्यांनीही हजेरी लावत कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवले. यावेळी खा. बळवंत वानखडे, माजी मंत्री यशोमती ठाकूर, माजी मंत्री सुनील देशमुख, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल येवले, कार्याध्यक्ष अनिकेत ढेंगळे, प्रदेश महासचिव परीक्षित जगताप, नितीन काळे यांच्यासह युवक काँग्रेसचे व काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामीण आणि शहरी भागातून आलेल्या कार्यकर्त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे काही काळ वाहतूकही विस्कळीत झाली होती. या घटनेनंतर दोन्ही पक्षांमधील राजकीय संघर्ष आगामी काळात आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.





