दर्यापूर बाजार समितीत 17 अनधिकृत हमालांचा वावर
प्रशासनाला परप्रांतीय मजुरांची कोणतीही ठोस माहिती नाही

शेतकर्यांच्या मालाची सुरक्षितता वार्यावर आल्याने चौकशीची मागणी
दर्यापूर/17 नोव्हेंबर – स्थानिक दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या 17 अनधिकृत हमाल विनापरवाना काम करत असल्याची चर्चा शहरात जोरात सुरू आहे. हे मजूर नेमके कुठून आले आणि त्यांची ओळख काय याबाबत प्रशासनाकडे कोणतीही अधिकृत नोंद नसल्याने स्थानिक व्यापारी, हमाल आणि शेतकर्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला असून सुरक्षेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे.
बाजार समितीत काम करणार्या हमालांची नोंदणी, ओळखपत्र आणि पोलीस पडताळणी बंधनकारक असते. मात्र हे नवे मजूर कोणत्याही नोंदणीशिवाय थेट काम करत असल्याचा आरोप होत आहे. अडते व्यापारी अनिस घानेवाले यांच्याकडे हे मजूर काम करत असल्याची चर्चा स्थानिक पातळीवर सुरू आहे. याबाबत त्यांची बाजू अद्याप समोर न आल्याने उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
दररोज हजारो शेतकरी आपला शेतमाल विक्रीसाठी येथे घेऊन येतात. अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रोख व्यवहार आणि मालाची मोजमाप सुरू असते. अनोळखी व्यक्तींच्या वावरामुळे मालाची चोरी किंवा वजनात फसवणूक झाल्यास जबाबदारी कोणाची असा सवाल शेतकरी विचारत आहेत.
परिसरात पोलिसांची गस्त नसल्याने बाहेरील व्यक्तींना मोकळे रान मिळाले आहे. हा केवळ मजुरांचा तुटवडा भरून काढण्याचा प्रकार आहे की यामागे काही वेगळे कारण आहे हे तपासानंतरच स्पष्ट होईल. त्यामुळे बाजार समिती प्रशासन, पोलीस आणि कामगार विभागाने संयुक्तपणे या 17 मजुरांची कसून चौकशी करून त्यांचे मूळ गाव आणि ओळख स्पष्ट करावी अशी मागणी जोर धरत आहे.





