वर्धा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करणार्‍यांवर कारवाई

रेती तस्करांकडून 7 लाखांचा मुद्देमाल जप्त

स्थानिक गुन्हे शाखा आणि महसूलचा छापा

धामणगाव रेल्वे / 18 नोव्हेंबर – अमरावती ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने आणि महसूल विभागाने बोरगाव धांदे परिसरात वर्धा नदीपात्रातून विनापरवाना वाळू उपसा करणार्‍या टोळीवर मोठा छापा टाकला. या धडाकेबाज कारवाईत तस्करीसाठी वापरण्यात येणारे ट्रॅक्टर आणि वाळूसह एकूण 7 लाख 8 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून संतोष पोयाम व रणजीत ढानके या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील अवैध रेती तस्करीला आळा घालण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी कंबर कसली आहे. बोरगाव धांदे शिवारातील जुईगावकडून वाहणार्‍या वर्धा नदीच्या पात्रातून काही इसम विनापरवाना वाळू उपसा करून वाहतूक करत असल्याची पक्की खबर स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. पथकाने तातडीने धामणगाव रेल्वेच्या तहसीलदारांशी संपर्क साधला आणि महसूल विभागाच्या अधिकार्‍यांना सोबत घेत नदीपात्रात धाड टाकली. यावेळी महिंद्रा 475 कंपनीचा ट्रॅक्टर आणि ट्रॉलीद्वारे वाळू चोरून नेताना दोघे रंगेहाथ सापडले.
पोलिसांनी ट्रॅक्टर चालक संतोष भिमराव पोयाम (वय 44) आणि मालक रणजीत चंद्रभानजी ढानके (वय 45, दोघेही रा. बोरगाव धांदे) यांना ताब्यात घेतले. या कारवाईत 6 लाख रुपयांचा ट्रॅक्टर, 1 लाखाची ट्रॉली आणि 8 हजार रुपये किमतीची 2 ब्रास वाळू असा एकूण 7 लाख 8 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. याप्रकरणी मंगरूळ दस्तगीर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023, पर्यावरण संरक्षण कायदा आणि सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवला आहे.

Back to top button