धामणगाव रेल्वेतील घरफोडीचा अवघ्या 24 तासांत उलगडा

स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी फत्ते

दोघांना अटक करून मुद्देमाल जप्त

धामणगाव रेल्वे /18 नोव्हेंबर- शहरातील मोहम्मदपुरा भागातील एका बंद घराचे कुलूप तोडून चोरी करणार्‍या दोन सराईत चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या चोवीस तासांत जेरबंद केले आहे. या कारवाईत पोलिसांनी चोरट्यांकडून 13 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करत घरफोडीचा गुन्हा यशस्वीरीत्या उघडकीस आणला.
अमरावती ग्रामीण भागातील चोरी, घरफोडी आणि जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून देण्यात आल्या होत्या. त्यानुसार दत्तापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घरफोडीचा स्थानिक गुन्हे शाखेचे पथक समांतर तपास करत होते. 18 नोव्हेंबर रोजी दत्तापूर पोलीस ठाण्यात या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम 331(3), 331(4) आणि 305(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. मोहम्मदपुरा प्रभाग क्रमांक 4 मधील रहिवासी रेखा ईश्वर मानकर (वय 55) यांच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला. चोरट्यांनी घरातून स्वयंपाकाचा गॅस सिलेंडर, पितळी ताटे आणि लोखंडी कपाटातील 20 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 22 हजार 400 रुपयांचा ऐवज लांबवला होता.
तपास पथक चांदूर रेल्वे परिसरात गस्त घालत असताना गोपनीय बातमीदाराकडून संशयितांची पक्की माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने तात्काळ मोहम्मदपुरा येथे सापळा रचून संशयितांना ताब्यात घेतले. कसून चौकशी केली असता त्यांनी घरफोडी केल्याची कबुली दिली. या प्रकरणी मोहम्मदपुरा येथील रहिवासी हृषीकेश मनोज पटले (वय 26) आणि कृष्णा सुधाकर नेवारे (वय 30) या दोघांना अटक करण्यात आली. आरोपींच्या ताब्यातून चोरीला गेलेला गॅस सिलेंडर, 11 हजार 700 रुपये रोख रक्कम आणि चोरीसाठी वापरलेली लोखंडी सळई असा एकूण 13 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चोरीतील उर्वरित रोख रक्कम खर्च केल्याचे आरोपींनी चौकशीत सांगितले. या धडाकेबाज कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Back to top button