दिवाळीच्या गर्दीत नियम मोडणार्या खासगी बसचालकांचे धाबे दणाणले
आरटीओच्या सहा भरारी पथकांची राज्यभर चर्चेत येईल अशी धडक मोहीम 17 दिवसांत 16.48 लाखांचा दंड वसूल

अमरावती/18 नोव्हेंबर : दिवाळी म्हणजे प्रवाशांची गर्दी आणि याच गर्दीचा फायदा घेत काही खासगी बसचालकांकडून प्रवाशांची आर्थिक लूट करण्याचे प्रकार घडतात. मात्र, अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय, अमरावतीने यंदा आक्रमक पवित्रा घेतला. अवाजवी भाडे आकारणी, अनधिकृत मालवाहतूक आणि मोटार वाहन कायद्याच्या नियमांचे उल्लंघन करणार्या वाहनचालकांविरुद्ध सहा भरारी पथकांच्या माध्यमातून विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत अवघ्या 17 दिवसांत तब्बल 16 लाख 48 हजार 620 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
दिनांक 1 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर या कालावधीत राबविण्यात आलेल्या या मोहिमेत प्रवाशांकडून निर्धारित दरापेक्षा अधिक भाडे आकारणार्या 79 खाजगी बसेसवर कारवाई करण्यात आली. तसेच अनधिकृत मालवाहतूक करणार्या 82 खाजगी बसेस आणि मोटार वाहन कायद्याच्या विविध नियमांचे उल्लंघन करणार्या अन्य 123 खाजगी बसेसवरही कारवाईचा बडगा उगारण्यात आला. प्रवाशांची आर्थिक लूट थांबविण्यासोबतच क्षमतेपेक्षा अधिक मालवाहतूक रोखणे, वाहनांची नियमबद्धता तपासणे आणि रस्ते सुरक्षेला प्राधान्य देणे या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात आली.
या विशेष तपासणी मोहिमेची सविस्तर माहितीसह आकडेवारी प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे जनसंपर्क अधिकारी अनिल मानकर यांनी दिली. दिनांक 1 ते 17 नोव्हेंबर या कालावधीत एकूण 1290 खाजगी बसेसची तपासणी करण्यात येऊन यामध्ये 284 वाहने दोषी आढळून आल्याने त्यांचेवर मोटार वाहन कायद्याचे विविध कलमांच्या नियमान्वये कारवाई करण्यात आली असून, या मोहिमेतून 16 लाख 48 हजार 620 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
दिवाळीच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या हिताचे संरक्षण आणि रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने आरटीओच्या प्रादेशिक परिवहन कार्यालय, अमरावतीने राबविलेली ही विशेष मोहीम राज्यभर लक्षवेधी ठरली आहे. नियमांचे उल्लंघन करणार्यांविरुद्ध आरटीओच्या परिवहन विभागाने दाखविलेल्या कठोर भूमिकेमुळे खासगी बस वाहतूक क्षेत्रातही या कारवाईची चर्चा राज्यभर सुरू झाली आहे.
सहा भरारी पथकांच्या अधिकार्यांची उल्लेखनीय कामगिरी
प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा भरारी पथकांनी ही मोहीम यशस्वी केली. प्रत्यक्ष वाहन तपासणी, नियमभंगाची पडताळणी आणि नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येऊन या विशेष मोहिमेत मोटर वाहन निरीक्षक सचिन दळवी, कुणाल कुथे, अभिजीत खाडे, निखिल गायकवाड, सुरज मून, सहायक मोटार वाहन निरीक्षक कांचन जाधव,अंकिता सराफ, श्रुतिका गोपीवार, दर्शना पिंपळकर,प्रशांत मालोकार आदी अधिकारी या मोहिमेत सहभागी झालेले होते.
नियम मोडणार्यांची गय नाही
सणासुदीच्या काळात प्रवाशांची संख्या वाढत असताना त्यांच्या अडचणींचा गैरफायदा घेऊन अवाजवी भाडे आकारणे किंवा वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक मालवाहतूक करणे हे गंभीर प्रकार आहेत. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी परिवहन विभागाने विशेष तपासणी मोहीम राबविली. प्रवाशांची सुरक्षितता आणि हितरक्षण हे आमचे प्राधान्य असून मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणार्यांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई करण्यात येईल.
– उर्मिला पवार, प्रादेशिक परिवहन अधिकारी, अमरावती





