अंजनगाव सुर्जी क्रीडा संकुलाला मिळणार गती

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची महत्त्वपूर्ण बैठक

आ. गजानन लवटे यांच्या पाठपुराव्याला यश

अमरावती/18 नोव्हेंबर – अंजनगाव सुर्जी येथील तालुका क्रीडा संकुलासाठी 1.4 हेक्टर जागा उपलब्ध करून देण्यासाठी महसूल तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. दर्यापूरचे आ. गजानन मोतीरामजी लवटे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश आले असून प्रस्तावित जागेची संयुक्त पाहणी करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत. अंजनगाव सुर्जी तालुक्यातील तरुण आणि खेळाडूंसाठी सुसज्ज क्रीडा संकुल उभारणीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. आ. गजानन मोतीरामजी लवटे यांनी 24 ऑगस्ट 2026 रोजी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र देऊन या प्रश्नावर बैठक घेण्याची मागणी केली होती. त्यानुसार 18 नोव्हेंबर रोजी मंत्रालयातील दालन क्रमांक 105 मध्ये ही बैठक पार पडली.
मौजे खेल हागोने येथील सर्व्हे क्रमांक 5 मधील कृषी विभागाची 1.4 हेक्टर जमीन विनावापर पडून आहे. ही जमीन क्रीडा संकुलासाठी मिळावी अशी मागणी आ. लवटे यांनी लावून धरली होती. बैठकीत या जागेबाबत सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर अमरावती जिल्हाधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी, जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी प्रत्यक्ष जागेची पाहणी करून पुढील कार्यवाही करावी अशा स्पष्ट सूचना चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या. या बैठकीला कृषी विभागाचे सचिव परिमल सिंह, अमरावती जिल्हाधिकारी आशिष येरेकर, महसूल विभागाचे कक्ष अधिकारी संकेत शिंदे यांच्यासह कृषी व क्रीडा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या निर्णयामुळे अंजनगाव सुर्जी भागातील खेळाडूंच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
खेळाडूंचा सराव होणार आता अधिक सोपा-अंजनगाव सुर्जी परिसरातील तरुण तरुणी पोलीस आणि सैन्य भरतीसोबतच विविध खेळांचा सराव करतात. मात्र हक्काचे मैदान नसल्याने त्यांची मोठी गैरसोय होत होती. नगरपरिषदेच्या विकास आराखड्यात आरक्षण क्रमांक 21 नुसार क्रीडा संकुलासाठी जागा आरक्षित असली तरी खेल हागोने येथील कृषी विभागाची जागा संकुलासाठी अधिक सोयीची ठरणार आहे.

Back to top button