रमाकांत गावंडे हल्ल्याच्या निषेधार्थ आज मोर्शी बंद
नगरपरिषद छतावरील मटण पार्टी प्रकरण

सकाळी आठ ते दुपारी दोन पर्यंत प्रतिष्ठाने बंद; पोलिसांचा बंदोबस्त
आरोपींच्या तात्काळ अटकेसाठी कृती समिती आक्रमक
नगरसेवकासह सहा जणांवर गुन्हे दाखल
मुख्याधिकारी पराग वानखडे यांच्या निलंबनाचा प्रस्ताव शासनाकडे
मोर्शी/19 नोव्हेंबर – नगरपरिषदेच्या इमारतीच्या छतावर रंगलेल्या मटण मेजवानीचे चित्रीकरण केल्याच्या रागातून रमाकांत नरेंद्र गावंडे पाटील यांचे अपहरण करून त्यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या निषेधार्थ आणि आरोपींच्या तात्काळ अटकेच्या मागणीसाठी आज गुरुवारी 19 नोव्हेंबर रोजी मोर्शी कृती समितीतर्फे कडकडीत मोर्शी बंदची हाक देण्यात आली आहे. सकाळी आठ ते दुपारी दोन वाजेपर्यंत शहरातील सर्व व्यवहार आणि प्रतिष्ठाने बंद ठेवून नागरिकांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन कृती समितीच्या वतीने करण्यात आले असून या बंदच्या पार्श्वभूमीवर शहरात तणावपूर्ण शांतता आहे.
प्रशांत वसाहतीत राहणारे चाळीस वर्षीय रमाकांत गावंडे पाटील यांनी 13 नोव्हेंबर रोजी नगरपरिषदेच्या छतावरील मेजवानीचे चित्रीकरण केले होते. या गैरप्रकाराविरोधात तक्रार केल्याच्या रागातून शिंभोरा रस्त्यावरून त्यांचे अपहरण करून नशीदपूर फाट्याजवळ त्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. हल्लेखोरांकडे बंदुकीसारखे शस्त्र असल्याचा आरोपही त्यांनी केला असून सध्या त्यांच्यावर अमरावती येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या निंदनीय प्रकारामुळे संपूर्ण मोर्शी शहरात संतापाची लाट उसळली असून शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी आणि पीडित युवकाला न्याय मिळवून देण्यासाठी मोर्शी कृती समितीने आजच्या बंदचे हत्यार उपसले आहे.
ठाणेदार राहुल आठवले यांनी नगरसेवक रवींद्र गुल्हाने आणि गौरव गुल्हाने यांच्यासह सहा जणांवर कठोर कलमांखाली गुन्हे नोंदवले असून फरार आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची सहा विशेष पथके रवाना झाली आहेत. बंदच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोर्शी पोलिसांनी शहरात मोठा फौजफाटा तैनात केला असून कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.
मुख्याधिकार्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव नगर विकास विभागाकडे
मोर्शी नगरपरिषदेच्या छतावरील या वादग्रस्त मटण मेजवानीची जिल्हाधिकारी आशीष येरेकर यांनी अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. या मेजवानीसाठी नगरपरिषदेचा कोणताही शासकीय निधी वापरला नसून खाजगी वर्गणीतून हा कार्यक्रम केल्याचा लेखी खुलासा मुख्याधिकारी पराग वानखडे यांनी दिला होता. मात्र हा खुलासा असमाधानकारक ठरवत जिल्हाधिकार्यांनी त्यांच्या निलंबनाचा आणि विभागीय चौकशीचा प्रस्ताव राज्य नगर विकास विभागाच्या प्रधान सचिवांकडे पाठवला आहे.
पीडित युवकाची पोलीस संरक्षणाची आणि विम्याची मागणी
रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रमाकांत गावंडे पाटील यांनी आपले कोणाशीही वैयक्तिक वैर नसून केवळ प्रशासकीय गैरकारभाराविरुद्ध आवाज उठवल्याने हा हल्ला झाल्याचे सांगितले आहे. लोकशाही व्यवस्थेत प्रत्येक नागरिकाला संविधानानुसार जगण्याचा अधिकार असल्याचे सांगत त्यांनी स्वतःला आणि आपल्या सहकार्यांना तात्काळ पोलीस संरक्षण देण्याची आणि जीवन विम्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी शासनाकडे केली आहे.





