जवळा शहापूरच्या रक्तदान शिबिराला मोठा प्रतिसाद
नागरिकांसह युवकांंचा उत्स्फूर्त सहभाग

टाकरखेडा शंभू/17 नोव्हेंबर : चांदूरबाजार तालुक्यातील जवळा शहापूर येथे श्री सर्वज्ञ महानुभाव सेवा समिती, जवळा शहापूर आणि मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, 16 नोव्हेंबर रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला युवकांसह परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
अमरावती जिल्हा ग्रामीण महानुभाव सेवा मंडळाच्या प्रेरणेने आयोजित श्री पंचकृष्ण समाजप्रबोधन व्याख्यानमाला, श्रीमद्भागवत कथा तसेच महानुभाव पंथीय भव्य मेळाव्याच्या निमित्ताने या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
रक्तदान हे श्रेष्ठदान असून, गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, या उदात्त हेतूने अनेक रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांसोबतच सामाजिक बांधिलकी जपत आयोजकांनी मानवसेवेचा आदर्श निर्माण केला.शिबिराच्या यशस्वितेसाठी श्री सर्वज्ञ महानुभाव सेवा समितीचे पदाधिकारी, अक्षय ठाकरे मित्र परिवारातील सदस्य तसेच परिसरातील कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. या स्तुत्य सामाजिक उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.





