साईनगर परिसरातील समस्यांचा घेतला आढावा

उपमहापौर सचिन भेंडे यांचा विविध भागांत दौरा

अमरावती/17नोव्हेंबर– साईनगर प्रभागातील तिरुपती नगर, सदनी नगर, साने गुरुजी नगर क्रमांक 1, चंदन नगर आणि वडनेरखाडी परिसरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी महापालिकेचे उपमहापौर सचिन भेंडे यांनी प्रत्यक्ष पाहणी दौरा केला. या दौर्‍यात त्यांनी नागरिकांशी संवाद साधत परिसरातील स्वच्छता, झाडांमुळे निर्माण होणार्‍या अडचणी, रस्त्यांची दुरवस्था, नाल्यांची कामे आणि इतर मूलभूत सुविधांबाबत माहिती घेतली. नागरिकांनी मांडलेल्या तक्रारींची गंभीर दखल घेत संबंधित अधिकार्‍यांना आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करण्याचे निर्देश दिले. शहरातील विविध भागांमध्ये नागरिकांना भेडसावणार्‍या समस्यांचा प्रत्यक्ष आढावा घेण्याच्या उद्देशाने हा दौरा करण्यात आला. परिसरातील स्वच्छतेचा प्रश्न, रस्त्यांची अपूर्ण कामे आणि नाल्यांच्या बांधकामातील अडचणी याबाबत नागरिकांनी उपमहापौरांचे लक्ष वेधले. केवळ तक्रारी ऐकून न घेता त्यावर प्रत्यक्ष काम सुरू होणे महत्त्वाचे असल्याचे सांगत भेंडे यांनी अधिकार्‍यांना कामात दिरंगाई न करण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान, शहरात डेंग्यूचा वाढता धोका लक्षात घेता साईनगर प्रभागात नियमित स्वच्छतेसोबतच धूरफवारणी आणि औषध फवारणी करण्यावर विशेष भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. साचलेले पाणी, कचरा आणि अस्वच्छ परिसरामुळे डासांची उत्पत्ती वाढू नये, यासाठी आरोग्य विभागाने नियमित लक्ष ठेवण्याच्या सूचनाही दिल्या. नागरिकांना स्वच्छ आणि सुरक्षित परिसर मिळावा, रस्ते व नाल्यांची कामे वेळेत पूर्ण व्हावीत आणि प्रभागाचा नियोजनबद्ध विकास व्हावा, यासाठी प्रशासनाने जबाबदारीने काम करावे, असे त्यांनी सांगितले.

Back to top button