12 वर्षांत 6 नवजात चिमुकल्यांचा परस्पर सौदा
डॉ. भोजने दाम्पत्यांकडून बाळ विक्री प्रकरणाला नवीन वळण

डॉ. वैशाली भोजनेंची पोलिसांसमोर धक्कादायक कबुली
आरोपी दाम्पत्याला 20 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी
महत्वाचे धागेदोरे शोधण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान
अमरावती /17 नोव्हेंबर– अल्पवयीन मुलीच्या नवजात बाळाचा 3 लाख 50 हजार रुपयांत सौदा करण्याच्या प्रयत्नात अटक झालेल्या डॉ. वैशाली भोजने हिने 2014 ते 2026 या 12 वर्षांच्या काळात तब्बल 6 बाळे विविध संस्था व व्यक्तींकडे दिल्याची धक्कादायक कबुली पोलिसांना दिली आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून 24 दिवस फरार असलेले डॉ. वैशाली भोजने आणि पती प्रफुल्ल भोजने यांना साईनगर व अकोली परिसरातून अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना 20 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात तपास अधिकारी उपनिरीक्षक मिलिंद हिवरे हे पुढील तपास करत आहेत. बुटी प्लॉट येथील भोजने प्रसूतीगृहात एका 17.5 वर्षीय अल्पवयीन मुलीचीबेकायदेशीर प्रसूती करून तिच्या बाळाची विक्री करण्याचा डाव आखल्याप्रकरणी 18 ऑक्टोबर रोजी फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात मानवी तस्करी आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच डॉ. वैशाली भोजने आणि प्रफुल्ल भोजने यांनी प्रसूतीगृहाला कुलूप लावून पळ काढला होता. गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे साईनगर आणि अकोली भागात सापळा रचून महिला पोलिसांच्या मदतीने दोघांना ताब्यात घेतले. तपासादरम्यान पोलिसांनी पळून जाण्यासाठी वापरलेली चारचाकी गाडी आणि 2 भ्रमणध्वनी संच जप्त केले असून दोघांच्या हस्ताक्षराचे नमुनेही घेतले आहेत. पोलीस कोठडीत प्रफुल्ल भोजने तपासात सहकार्य करत असले तरी डॉ. वैशाली भोजने दिशाभूल करणारी उत्तरे देत असल्याचा पोलिसांचा दावा आहे. चौकशीत तिने जन्मदात्या पालकांना नकोशी झालेली 6 बाळे त्यांच्या संमतीने योग्य कुटुंब मिळावे म्हणून दिल्याचा बचाव केला असून यातील कोणतीही माता अल्पवयीन नसल्याचे सांगितले आहे. तसेच पैशांच्या व्यवहाराशी आपला संबंध नसल्याचे ती म्हणत आहे. आता ही 6 बाळे नेमकी कोणाकडे आहेत आणि त्यामागे काही आर्थिक व्यवहार झाला का याचा कसून शोध पोलीस घेत आहेत. याशिवाय या रॅकेटमध्ये जयस्वाल नावाच्या व्यक्तीच्या भूमिकेचाही तपास सुरू असून आणखी कोणाचा सहभाग आहे का हे शोधण्यासाठी न्यायालयाने दोघांची कोठडी 20 नोव्हेंबरपर्यंत वाढवली आहे.
व्हायरल ध्वनिफीत प्रयोगशाळेत तपासणीसाठी जाणार
समाजमाध्यमांवर पसरलेल्या एका ध्वनिफीतीमध्ये बाळाच्या विक्रीचा व्यवहार ठरत असल्याचा संवाद ऐकू येत असून तो आवाज डॉ. वैशाली भोजने हिचाच असल्याचा आरोप शिवसेनेच्या महिला पदाधिकार्यांनी केला होता. या आरोपांची सत्यता पडताळण्यासाठी पोलिसांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि न्यायवैद्यक प्रयोगशाळेशी पत्रव्यवहार केला आहे. तपास अधिकारी उपनिरीक्षक मिलिंद हिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली 17 नोव्हेंबर रोजी शासकीय पंचांच्या समक्ष डॉ. वैशाली भोजने हिच्या आवाजाचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले जाणार आहेत.





