सक्करसाथच्या भैरवबाबा मंदिरात अन्नकूट सोहळा
छप्पन भोगांचा नैवेद्य अर्पण करून भक्तांना प्रसाद वाटप

फुलांच्या माळांनी मंदिराची आकर्षक सजावट
अमरावती/17 नोव्हेंबर – सक्करसाथ येथील भैरवबाबा मंदिरात मंगळवारी सायंकाळी अन्नकूट प्रसाद सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले. यानिमित्त मंदिरात आकर्षक सजावट करून भैरवबाबांना छप्पन प्रकारच्या खाद्यपदार्थांचा नैवेद्य अर्पण करण्यात आला. फुलांच्या सुंदर माळांनी सजवलेल्या मंदिरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. या सोहळ्याला हजारो भाविकांनी श्रद्धेने उपस्थित राहून दर्शन घेत प्रसादाचा लाभ घेतला.
अन्नकूट सोहळ्यानिमित्त मंदिराची विशेष तयारी करण्यात आली होती. मंदिराचा परिसर विविध फुलांच्या माळांनी सजविण्यात आला होता. या आकर्षक सजावटीमुळे मंदिराला सुंदर रूप प्राप्त झाले होते. भैरवबाबांच्या दर्शनासाठी येणार्या भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी आयोजकांकडून योग्य व्यवस्था करण्यात आली होती. या सोहळ्यात छप्पन भोगांचा नैवेद्य अर्पण करणे हे मुख्य आकर्षण ठरले. धार्मिक श्रद्धेतून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले. भाविकांना शांततेत दर्शन घेता यावे आणि प्रसादाचा लाभ मिळावा, यासाठी विशेष नियोजन करण्यात आले होते. या आयोजनासाठी परिसरातील सर्व व्यापारी बांधव, गुमास्ते तसेच नागरिक आणि मान्यवरांनी सहकार्य केले. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून अन्नकूट सोहळा उत्साहात पार पडला.





