लुटीच्या उद्देशाने निर्घृण हत्या; अमरावतीच्या दोघांची जन्मठेप कायम

मृत कॅश कलेक्शन प्रतिनिधीवर चाकूने वार करून लुटले होते

नागपूर खंडपीठाचा निर्णय

अमरावती /17 नोव्हेंबर – अमरावतीतील गाजलेल्या लूट आणि हत्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दोन्ही आरोपींची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली आहे. रोख रक्कम लुटण्याच्या उद्देशाने कॅश कलेक्शन प्रतिनिधी महेश फेरवानी यांच्यावर चाकूने वार करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात सत्र न्यायालयाने दिलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेला आव्हान देणारी आरोपी शैलेश हंसराज चौधरी (41, रा. बेलपुरा) आणि रवी गणपत धोते (40, रा. हमालपुरा) यांची अपील उच्च न्यायालयाने फेटाळली. न्यायमूर्ती शिवकुमार डिगे आणि न्यायमूर्ती रोहित जोशी यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.
महेश फेरवानी हे 28 ऑगस्ट 2016 रोजी कामावर गेले होते. त्याच रात्री सुमारे 11 वाजता त्यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळला. तपासात रोख रक्कम लुटण्यासाठी आरोपींनी त्यांच्यावर चाकूने हल्ला करून हत्या केल्याचे समोर आले होते. या प्रकरणात पोलिसांनी आरोपींचे कपडे जप्त केले होते. त्या कपड्यांवर मृताच्या रक्ताचे डाग आढळले. मात्र, आरोपींना या रक्ताच्या डागांबाबत समाधानकारक स्पष्टीकरण देता आले नाही. शैलेश चौधरी याच्याकडून 88 हजार 400 रुपये आणि काळी पिशवी, तर रवी धोते याच्याकडून 50 हजार रुपये जप्त करण्यात आले होते. या रकमेचा स्रोतही आरोपींना स्पष्ट करता आला नाही. 10 नोव्हेंबर 2021 रोजी सत्र न्यायालयाने दोघांना हत्या आणि लुटीच्या गुन्ह्यात दोषी ठरवून जन्मठेप व प्रत्येकी 2 हजार रुपये दंड सुनावला होता. उच्च न्यायालयाने सर्व परिस्थितीजन्य पुरावे आणि जप्त साहित्य तपासल्यानंतर सत्र न्यायालयाचा निर्णय योग्य ठरवला. त्यामुळे दोन्ही आरोपींना दिलेली शिक्षा कायम राहिली.

Back to top button